कणकवली : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गट-तट निर्माण केल्यानेच तो पक्ष संपत चालला आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होत आहे. गेली अनेक वर्षे नारायण राणे यांच्याशी आम्ही संघर्ष केला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे कधीही शक्य नसल्याने माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांनी येथे स्पष्ट केली.गेले काही दिवस बाळा भिसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून अन्य पक्षात जाणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. रविवारी येथील विजय भवनमध्ये जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपण शिवसेना प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, आबू पटेल, नगरसेवक सुशांत नाईक, डॉ. प्रवीण सावंत, तालुकाप्रमुख सचिन सावंत, राजू राठोड, आदी उपस्थित होते. यावेळी बाळा भिसे म्हणाले, आता पालकमंत्री असलेले दीपक केसरकर शिवसेनेत प्रवेश करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला अनेक राजकीय शब्द दिले होते. मात्र, त्यांची पूर्तता झाली नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारावर दृढ राहून आतापर्यंत आम्ही पक्षवाढीसाठी कार्यरत राहिलो, परंतु आमचा वेळोवेळी भ्रमनिरास झाला. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यावर प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन जिल्ह्यातीलराजकीय स्थितीबाबत त्यांचे लक्ष वेधले होते; पण उपयोग झाला नाही. त्याचबरोबर जिल्ह्याचे संपर्क नेते भास्कर जाधव यांना सर्व स्थिती सांगण्यात आली. त्यांनीही वरिष्ठांशी चर्चा केली. त्याचाही काही उपयोग झाला नाही. आता काँग्रेसच्या दावणीला राष्ट्रवादी पक्ष बांधण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ‘सिंधुदुर्गात राणेंना दुखवून चालणार नाही’ असा संदेश आम्हाला वरिष्ठांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता आम्हाला इतर पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही.केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना त्याचा स्थानिक स्तरावर किती उपयोग होतो हे महत्त्वाचे असते. शिवसेना हा पक्ष आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य जनतेसाठी विकासात्मक काम करीत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना या पक्षात मानसन्मान मिळावा तसेच विकासाभिमुख कामे व्हावीत एवढीच आम्ही शिवसेनेकडून अपेक्षा ठेवली आहे. (प्रतिनिधी)चौकटहे तर पोस्टर बॉयचे काम!शिवसेनेत प्रवेश करताना आम्ही कोणतीही अट ठेवलेली नाही. मला महामंडळ किंवा आमदारकी पाहिजे अशी आमची मागणी नाही. हे तर पोस्टर बॉयचे काम आहे, अशी टीकाही भिसे यांनी कोणाचेही नाव न घेता यावेळी केली. तसेच २५ जानेवारीनंतर राष्ट्रवादीकडे जिल्ह्यात फक्त कबड्डीची टीमच राहील, असेही ते म्हणाले.शिवसेनेला चांगला प्रतिसाद!सामान्य जनतेला न्याय देण्याबरोबरच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते तसेच नेत्यांचा योग्य तो सन्मान केला जात आहे. यापुढेही केला जाईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच जिल्ह्यात एक वेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळेल, असे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.२५ जानेवारी रोजी प्रवेश !कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात २५ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्यात माझ्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील. मात्र, त्यांची नावे आता जाहीर केली तर विरोधक त्यांना त्रास देतील. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये काही काँग्रेस कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. कणकवली शहरातून यावेळी रॅलीही काढण्यात येणार आहे, असे बाळा भिसे यावेळी म्हणाले.
बाळा भिसे शिवसेनेत जाणार
By admin | Published: January 22, 2017 11:33 PM