सावंतवाडी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत. अल्प कालावधीत व खर्चात अधिक उत्पन्न देणारे पिक म्हणून बांबूंची लागवड योग्य असून त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी उचलावा, असे आवाहन तज्ज्ञ शेतकरी मिलिंद पाटील यांनी केले.‘कोकण सरस’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक यांची कार्यशाळा जिल्हा परिषद कृषी विभाग व पशू संवर्धन विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विकास अधिकारी एस. एन. मेथरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी सत्यनारायण चंदेल, सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी ए. बी. परब, तंत्राधिकारी सी. जी. गायकवाड, एम. एच. मोटे आदी उपस्थित होते.यावेळी तज्ज्ञ शेतकरी मिलिंद पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, बांबू उत्पादनाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या उत्पादनाला बदलत्या वातावरणाचा त्रास होत नाही. आपल्या मालकीच्या पडीक जमिनीत एकदा बांबूची लागवड केली की ५० वर्षे उत्पन्न घेता येते. बांबू उत्पादनासाठी कमी खर्च येतो. घर बसल्या उत्पन्नही घेता येते. बांबू लागवडीनंतर अधिक वर्षे होऊन गेल्यावर बांबूला काटा (फुले) आला की बांबूचे बेट पुन्हा तयार होते व ती आपोआप जगतात. त्याला पाण्याचीही आवश्यकता नाही. विशेष म्हणजे बांबू उत्पादन हे नाशवंत नसल्याने बांबूला दर चांगला मिळाला की विकता येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर शेतकरी विलास ठाकूर यांनी काजू लागवड व प्रक्रिया, मधुकर राणे यांनी बांबू लागवड, विक्री व प्रक्रिया तर कृषिग्राम व निसर्ग पर्यटनावर डॉ. विलास सावंत यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘शेळीपालन’ याविषयी एस. कविटकर यांनी व ‘कंदवर्गीय पीक लागवड’ याविषयी डॉ. म्हसकर यांनीही मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
पडीक जमिनीत बांबू लागवड फायदेशीर
By admin | Published: March 24, 2016 9:50 PM