मालवण : जलक्रीडा व्यवसायावर आणलेली स्थगिती ही ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीतील एक टप्पा आहे. पर्यटन व्यावसायिकांना देशोधडीला लावण्याचे धोरण असेल तर व्यावसायिकांचा उद्रेक होईल, असा इशारा भाजपचे प्रवक्ते तथा पर्यटन व्यावसायिक बाबा मोंडकर यांनी दिला.
कोरोना महामारी आणि नैसर्गिक आपत्तींशी कडवी झुंज देऊन स्वकष्टाने पर्यटन व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत. मात्र, साहसी जलक्रीडा प्रकारांवर प्रशासनाने बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्वतःचे पोट भरणाऱ्या व्यावसायिकांवर सरकार फौजदारी गुन्हे दाखल करीत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही.मोंडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, जलक्रीडा व्यवसायावर आणलेली स्थगिती ही ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीतील एक टप्पा आहे. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी जलक्रीडा, पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात.
आमदार वैभव नाईक यांनी केवळ दिखाऊपणा करून जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या सोडविल्या असा आभास निर्माण केला. त्यामुळे व्यावसायिकांनी आपल्या स्वकष्टातून दिलेला फुलांचा पुष्पगुच्छ आमदार नाईक यांनी स्वीकारला पण जबाबदारी स्वीकारली नाही. येणाऱ्या काळात नाईक यांनी बेजबाबदारपणा सोडून पर्यटन, मच्छिमार समाजासाठी आत्मियतेने काम करावे.मार्च महिन्यापासून कोरोना महामारीमुळे पयर्यटन व्यवसाय बंद झाला होता. जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालावधी वगळता पर्यटन हंगाम पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेली किनारपट्टीवरील शेकडो कुटुंबे आणि बेरोजगार युवकांपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.त्यातच दिवाळीपासून शासनाने अनलॉकअंतर्गत हळूहळू जिल्ह्याच्या सीमा खुल्या केल्या. त्यामुळे काही प्रमाणात पर्यटक सुटीच्या हंगामात सिंधुदुर्गात दाखल होऊ लागले. त्यामुळे आशेवर जगणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा बंदी आदेश काढल्यामुळे या पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे.पर्यटन मंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पहावेबंदर विभागाकडून अचानक स्कुबा डायव्हिंग, बोटींग, वॉटरस्पोर्ट बंदीचे आदेश देण्यात आल्याने पर्यटन व्यावसायिक चिंतातूर झाले आहेत. दिवाळी सणापासून व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जलक्रीडा व्यवसाय सुरू केले होते.
मात्र, अचानकपणे प्रशासनाकडून बंदीचे आदेश आले. हा सर्व विषय पर्यटनाशी जोडला असल्याने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही मोंडकर यांनी म्हटले आहे.