सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेस "बँको ब्ल्यू रिबन २०२३" पुरस्कार जाहीर झाला. सीबीएस प्रणालीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन ग्राहकांना सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा ०५ ऑक्टोबर २०२३ रोजी दमण येथे होणार आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अविज पब्लिकेशन, कोल्हापूर या संस्थेमार्फत हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अविज पब्लिकेशन, कोल्हापूर ही संस्था सहकार क्षेत्रासाठी देशपातळीवर एक मार्गदर्शक संस्था म्हणून १९९९ पासून काम करते. या संस्थेमार्फत विविध प्रकारच्या संस्थांची कामकाज पध्दती, सहकार क्षेत्रातील कायदे, त्यामध्ये वेळोवेळी होणारे बदल, आधुनिक तंत्रज्ञाना बाबतची अद्यावत माहिती संकलन व प्रसिध्दीचे कामकाज केले जाते. या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या व उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या विविध प्रकारच्या बँकिंग कामकाज करणाऱ्या संस्थांसाठी पुरस्कार प्रदान केले जातात. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला यापूर्वी ७ वेळा बँको पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. या पुरस्कारांबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी समाधान व्यक्त करत पुरस्कारांचे श्रेय संचालक, अधिकारी / कर्मचारी व ग्राहक यांना दिले आहे. तसेच भविष्यात ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रकारच्या सेवा-सुविधा उपलब्ध करुन देऊन बँकेचे "आपली माणसं आपली बँक" या ब्रिदवाक्याप्रमाणे कामकाज यापुढेही चालू राहिल अशी ग्वाही दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेस "बँको ब्ल्यू रिबन २०२३" पुरस्कार जाहीर
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 14, 2023 4:54 PM