बांदा : बांदा बसस्थानकातील स्वच्छतागृह व शौचालयात अस्वच्छतेमुळे पूर्णपणे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बांदा शहर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी बसस्थानकावर धडक देत स्थानकप्रमुखांना जाब विचारला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत साफसफाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. स्थानकातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून विहिरीतील पाणी अस्वच्छ असल्याने एसटी प्रशासन प्रवाशांच्या जीविताशी खेळ करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.महाराष्ट्र-गोवा सीमेवरील बांदा हे महत्त्वाचे बसस्थानक आहे. याठिकाणी शालेय, महाविद्यालयीन व स्थानिक प्रवाशांची वर्दळ मोठ्या संख्येने असते. बसस्थानकातील स्वच्छतागृह हे गेली २० वर्षे आहे त्या स्थितीत आहे. या इमारतीची दुरुस्तीदेखील करण्यात आली नाही. स्वच्छतागृहाला ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने परिसरात पूर्णपणे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.कोरोना विषाणूने पूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतातदेखील या रुग्णांची संख्या वाढती आहे. परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे प्रशासन आवाहन करीत असताना एसटी प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी एसटी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे प्रवाशांना अस्वच्छ शौचालयाचा नाईलाजाने वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी बांदा शहर भाजप कार्येकते यांनी एसटी बसस्थानकात धडक देत येथील संबंधित एसटी कर्मचारी यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.एसटी प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करून स्वच्छतागृह व शौचालयाची साफसफाई करावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पिण्याच्या पाण्याची विहीर झाडाझुडपांनी वेढली असून आतमध्ये कचऱ्याचे साम्राज्य आहे. या विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत अशी मागणी वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची भेट घेऊन करण्यात आली.यावेळी शहर अध्यक्ष राजा सावंत, सिद्धेश पावसकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, माजी सरपंच बाळा आकेरकर, बाळू सावंत, निलेश सावंत, बाबा काणेकर, हेमंत दाभोलकर, प्रवीण नाटेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बांदा बसस्थानक स्वच्छतागृहात दुर्गंध, भाजप कार्यकर्त्यांची स्थानकावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 3:03 PM
बांदा बसस्थानकातील स्वच्छतागृह व शौचालयात अस्वच्छतेमुळे पूर्णपणे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बांदा शहर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी बसस्थानकावर धडक देत स्थानकप्रमुखांना जाब विचारला.
ठळक मुद्देबांदा बसस्थानक स्वच्छतागृहात दुर्गंध, भाजप कार्यकर्त्यांची स्थानकावर धडक एसटीच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब