कणकवली : कणकवली उपनगराध्यक्षपदी गणेश उर्फ बंडू हर्णे यांचे बुधवारी एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे . पीठासिन अधिकारी तथा कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी ही निवड जाहीर केली .या निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या नगरसेवकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली . त्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण करत पीठासीन अधिकाऱ्यांनी हर्णे यांचे नाव जाहीर केले .या निवडीनंतर बंडू हर्णे यांचे नगराध्यक्ष समीर नलावडे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत , राष्ट्रवादीचे नगरसेवक अबीद नाईक , मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, उर्मी जाधव , प्रतीक्षा सावंत, विराज भोसले, रवींद्र गायकवाड ,संदीप नलावडे, शिशिर परुळेकर, महेश सावंत ,विठ्ठल देसाई ,बंडू गांगण आदींनी अभिनंदन केले .उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बंडू हर्णे म्हणाले , माजी मुख्यमंत्री नारायण राणे , माजी खासदार निलेश राणे , आमदार नितेश राणे , यांनी माझ्यावर विश्वास दाखवत जी जबाबदारी सोपवली ती निश्चितच नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यासाठी मी येत्या काळात प्रयत्न करणार आहे . तसेच कणकवली शहराच्या विकासाच्या दृष्टीने माझे जास्तीत जास्त योगदान देण्याचा मी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया बंडू हर्णे यांनी दिली .फटाक्यांची आतषबाजी !माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी गणेश उर्फ बंडू हर्णे उमेदवार असल्याचे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जाहीर केले. त्यानंतर बंडू हर्णे यांनी आपला अर्ज मुख्याधिकारी विनोद दावले यांच्याकडे दाखल केला.
सूचक म्हणून गटनेते संजय कामतेकर तर अनुमोदक म्हणून अभिजित मुसळे यांचे नाव या अर्जावर नमूद करण्यात आले होते. दुपारी बंडू हर्णे यांची निवड जाहीर झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी कणकवली शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली.अखेर प्रतीक्षा फळाला आली !बंडू हर्णे हे गेली काही वर्षे कणकवली नगरपंचायतमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असताना अनेकदा त्यांना नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष पदाने हुलकावणी दिलेली होती . नगरपंचायतवर आरोप झाले की त्याचे खुबीने उत्तर देण्यासाठी बंडू हर्णे नेहमीच पुढे येतात .
दोन वर्षांपूर्वीच्या नगरपंचायत निवडणुकीत त्यांचा अवघ्या २ मतानी विजय झाला होता . उपनगराध्यक्ष पदी कुणाला संधी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले असतानाच नारायण राणे व नितेश राणे यांच्याकडून अखेर बंडू हर्णे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.त्यामुळे अखेर त्यांची प्रतीक्षा फळाला आली.