निकेत पावसकर-- नांदगाव -नेहमीप्रमाणेच दररोज सकाळी उठून गुरे चरायला घेऊन जाणे...अनेक मैलाचा पायी प्रवास करणे... डोंगरदऱ्या सहज पार करणे...कोणत्याही प्रकारचा आजार शिवू न शकलेला...वयाची शतकी पूर्ण केल्यानंतरही आजही ते एस.टी.ने एकटेच प्रवास करतात. कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथील बंड्या नाना म्हणजे एक अवलिया. शंभर वर्ष पूर्ण केलीत तरीदेखील ते तरूणांना लाजवेल अशी दैनंदिन कामे करताना दिसतात.कणकवली तालुक्यातील साळीस्ते गावातील अनंत विश्राम गुरव म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच बंड्या नाना. गेली शंभर वर्षे बंड्या नाना नावाचा माणूस साळीस्ते गावात वावरतो. आजही त्यांची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. कित्येक वर्षांपूर्वीच्या अनेक घटना, प्रसंग ते सहजरित्या कोणत्याही प्रकारचा विलंब न करता चटकन सांगतात. बंड्या नानांना बोलते करायचे म्हणजे कोणालाही सहज शक्य आहे. अस्सल मालवणी बोलायला लागले की, बंड्या नाना आपल्या अनुभवातून आलेल्या गोष्टी सहज सांगतात आणि कोणत्याही वयाच्या माणसासोबत मिसळून जातात.पहाटे पाच वाजल्यापासून त्यांच्या दिवसाला आणि कामाला सुरूवात होते. अनेक मेहनतीची कामे करीत असल्यामुळे याही वयात त्यांना चष्मा लागलेला नसून त्यांची दृष्टी खूप चांगली आहे. दररोज चालणे व फिरणे यामुळे तब्बेत तंदुरूस्त आहे. हे सांगतात. त्यावेळी फुकटची शाळा शिकायला मिळायची. तरीदेखील शाळेत गेलोच नसल्याची कबुली ते देतात. आजच्या तरूणांना लाजवेल अशी शरीरयष्टी, अंगमेहनत, दररोजची विविध मेहनत ते आजही एवढ्या वयात करतात. एवढ्या वयानंतरही तंदुरूस्तीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, दररोजची करण्यात येणारी अंगमेहनतच माझ्या तंदुरूस्तीचे कारण आहे. आज अनेकजण व्यायाम करायला जातात. मात्र, आम्ही कोणत्याही प्रकारचे व्यायाम केले नाहीत. दैनंदिन कामे करताना जो व्यायाम होतो. तोच खरा व्यायाम असल्याचे त्यांनी सांगितले. साळीस्तेवासीयांतर्फे बंड्या नानांचा गौरवेवयाची शंभरी पूर्ण केल्याबद्दल साळीस्ते ग्रामस्थांनी बंड्या नानांचा सत्कार केला. सुमारे चार पिढ्यांचा हा इतिहास चालता बोलता अनुभवास मिळतो. गावातील अनेक लोक जुन्या घटनांसाठी बंड्या नानांकडून माहिती घेत असतात. बंड्या नानांसमवेत त्यांचा मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.अनेक वर्षे शेती केली. जोत धरले. खूप अंगमेहनतीचे काम केले. आज शेती कमी झाली असली तरीदेखील अंग मेहनतीचे काम मात्र, कमी झालेले नाही. सकाळी उठल्यानंतर गुरांना रानात चरायला घेऊन जाणे, त्यानंतर शेतीची कामे करणे आणि विविध अंगमेहनतीची कामे करणे हा दिनकर्म आजही आहे. पूर्वी वाहने कमी असल्याने तळेरे ते साळीस्ते हे पाच किलोमीटरचे अंतर दररोज चालत यायचे आणि जायचे. अलिकडे वाहनांची व्यवस्था झाल्यामुळे हा जरी प्रवास कमी झाला असला तरीदेखील दररोजचे चालणे कमी झाले नाही.- अनंत गुरव, साळीस्ते, कणकवली
बंड्या नाना.. प्रवास एका शतकानंतरचा
By admin | Published: December 04, 2015 10:51 PM