कोल्हापूर : कॉलनीत अनेक वर्षे गटारी नाहीत, रस्ते कुठे चांगले तर कुठे एकदमच खराब, अशी मूलभूत सुविधांची वानवा मीराबाग प्रभागात पाहावयास मिळते. भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेल्या जाऊळाचा गणपतीपासून सुरू होणारा प्रभाग हा लक्षतीर्थ वसाहतीत थांबतो. जिव्हाळा कॉलनी, सुतारमळा, विश्वभारती कॉलनी, उत्तरेश्वर पेठमधील काही भाग, धुण्याची चावी, लक्षतीर्थ वसाहतीमधील तीन गल्ल्या असा विस्तारलेला हा प्रभाग आहे. आजूबाजूला काळवट जमीन, उसाचे क्षेत्र असल्याने हा भाग ग्रामीण तोंडवळा असलेला दिसतो. सामान्य माणसांची वस्ती असलेल्या या प्रभागात गटारी व सांडपाण्याची समस्या नागरिकांची डोकेदुखी आहे. पाणी मुबलक आहे; पण कचऱ्याचा उठाव होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. विश्वभारती कॉलनीमध्ये यावर्षी काही रस्ते केले आहेत. येथे पाणी नियमित व मुबलक आहे; पण काही ठिकाणी गटारी नाहीत. त्यामुळे उघड्यावरच पाण्याचा लोट जाताना दिसतो. उत्तरेश्वर पेठेत दहा वर्षे झाली, विजेचा खांब पडून आहे. कचऱ्याचा उठाव होत नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतो. आमदार निधीतून काही रस्ते केले आहेत; पण गटारी नसल्याने हे रस्तेही फार काळ टिकतील असे वाटत नसल्याचे नागरिकांचे मत आहे. या प्रभागात महापालिकेचा एकही दवाखाना नाही, व्यायामशाळा नसल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहेत. ड्रेनेज नसल्याने पाणी उघड्यावरच सोडले जाते. परिणामी परिसरात अस्वच्छताही दिसते. औषध फवारणी आठ-पंधरा दिवसांनी केली जाते. सुतारमळा येथे कचरा कुंडी ओसंडून वाहताना दिसली. कचरा खाण्यासाठी भटकी कुत्री फिरत असल्याने नागरिक जीव मुठीत व नाक हातात धरून जाताना दिसले. सुतारमळा येथील एका गल्लीत डांबरीकरण करून रस्ता चकाचक केला आहे; पण त्याशेजारी सुमारे सात-आठ फूट खोल उघड्या गटारी आहेत. अनोळखी भागातील दुचाकीस्वार या परिसरात आला तर थेट या उघड्या गटारीमध्ये जाण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या गटारीमध्ये किमान दोन फूट पाणी व घाण असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. या घाणीमुळे डासांचे प्रमाण जास्त असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. चार वर्षांत सतेज पाटील व महापालिकेच्या माध्यमातून सहा कोटींची कामे केली. यामध्ये रस्ते, पाईपलाईनचे काम प्राधान्याने केले. काही ठिकाणी गटर्स प्रलंबित आहेत, त्याचबरोबर लक्ष्यतीर्थ-टेंबलाई मंदिर रस्त्याचे काम आगामी काळात पूर्ण करणार आहे. संपर्काबाबत नागरिकांच्या अपेक्षा असणार; पण मी सातत्याने कामांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. सर्व समस्या पाच वर्षांत पूर्ण होणार नाहीत, तरीही उर्वरित काळात प्रभाग समस्यामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू.- मीना सूर्यवंशी (नगरसेविका, मीराबाग)
मीराबागेत मूलभूत सुविधांची वानवा
By admin | Published: February 19, 2015 10:41 PM