रत्नागिरी : तालुक्यात फणसवळे गावातील कोंडवाडी व आंबेकरवाडीतील डेंग्यूची लागण आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. आज, सोमवारी आरोग्य विभागाच्या पथकाने तेथील साठविलेल्या पाण्याचे आणखी २७ कंटेनर रिकामे केले असून, त्यात असलेल्या डेंग्यू डासांच्या अळ्या नष्ट केल्या आहेत. त्यामुळे डेंग्यू अळ्यांमुळे रिकाम्या केलेल्या कंटेरनरची संख्या ४१ वर पोहोचली आहे. कोंडवाडीतील २१४ घरांमध्ये प्रतिबंधक धूर फवारणीही केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. गेल्या सहा दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात फणसवळे कोंडवाडीतील डेंग्यू व तापसरीचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. रविवारपर्यंत असलेल्या ६३ या रुग्णसंख्येत आज आणखी ११ रुग्णांची भर पडली आहे. यापूर्वीच काही रुग्णांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले आहे. रविवारी जे २८ रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते त्यातील ६ जणांना आज बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले, तर नव्याने ११ रुग्ण आज दाखल झाल्याने जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच ८ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातील चारजणांना काल घरी पाठविण्यात आले, तर उर्वरित डेंग्यूबाधित चारजणांवर उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
फणसवळेत डेंग्यूविरोधात ‘लढाई’ सुरूच
By admin | Published: December 09, 2014 1:01 AM