मालवण : मालवण शहराच्या राजकीय दृष्टीने प्रभाग पाचमधील निवडणूक प्रतिष्ठेची व चुरशीची मानली जात आहे. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडाचे निशाण हाती घेतलेले माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व स्नेहा आचरेकर हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. सुदेश आचरेकर हे नगराध्यक्षपदासह प्रभाग पाचमधून नगरसेवकपदाची निवडणूक लढवत आहेत. निवडणूक जिंकायची असल्याने आचरेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे राजा गावकर व शिवसेनेचे स्वप्नील आचरेकर हे दोन उमेदवार असल्याने या अस्तित्वाच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.प्रभाग पाचमध्ये मेढा व बाजारपेठ येथील भाग येत असल्याने ही निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची मानली जाते. गेल्या २० वर्षांत या प्रभागात सुदेश आचरेकर यांचे वर्चस्व आहे. यावेळी ते अपक्ष निवडणूक लढवत असल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेऊन मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठीवर भर दिला आहे, तर प्रभागातील बी वॉर्डातही तिरंगी लढत होत असून स्नेहा आचरेकर यांच्यासमोर पूजा सरकारे (भाजप), दीपाली वायंगणकर (काँग्रेस) यांचे आव्हान आहे. त्यामुळे शहराची राजकीय सूत्रे अवलंबून असणाऱ्या प्रभागांपैकी पाच नंबर प्रभागही महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे तिरंगी लढतीत आचरेकर यांना आपले वर्चस्व सिद्ध करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)सुदेश आचरेकर सहावेळा विजयीमालवणच्या राजकारणात आचरेकर घराण्याचे विशेष महत्त्व आहे. सुबोधराव आचरेकर यांच्यानंतर राजकीय धुरा सुदेश आचरेकर गेली २० वर्षे सांभाळत आहेत. प्रभाग ५ मधून गेली २० वर्षे एक पोटनिवडणूक व पाच सलग सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले व चारवेळा नगराध्यक्षपदी विराजमान झालेले सुदेश आचरेकर हे मालवण शहराचे ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जातात. आचरेकर घराण्याचे गेली ४०-४५ वर्षे मालवण पालिकेवर वर्चस्व दिसून आले आहे. यावेळी आचरेकर हे अपक्ष निवडणूक लढत असून आचरेकर यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे आचरेकर विजयी घोडदौड कायम ठेवतील याकडेही सऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेचे बंडेखोर काँग्रेसमध्ये!प्रभागातील दोन्हीही वॉर्डात आघाडी-युती आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होत आहे. विशेष म्हणजे सुदेश आचरेकर व स्नेहा आचरेकर यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केल्याने त्यांच्या जागी काँग्रेसने शिवसेनेतून उमेदवारी न मिळालेले राजा गावकर व दीपाली वायंगणकर हे दोन चेहरे आचरेकर यांच्या विरोधात उभे केले आहेत. गावकर व वायंगणकर यांच्याबरोबर शिवसेनेचे स्वप्नील आचरेकर व भाजपच्या पूजा सरकारे लढत देत आहेत. शहराचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती लागतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
मालवणमध्ये ‘अस्तित्वा’ची लढाई
By admin | Published: November 17, 2016 9:58 PM