सावंतवाडी : कोलगाव भोमवाडीतील गिरबादेवीजवळ गुरुवारी ब्राह्मण भोजनासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाश्यांनी हल्ला केला. यात तब्बल वीसजण जखमी झाले असून, यामध्ये पुरुषांसह महिला व लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांना सावंतवाडीतील कुटिर रुग्णालयात दाखल केले आहे. यातील चारजणांवर मधमाश्यांनी हल्ला केला आहे. या भोजनात दीडशे ग्रामस्थ सहभागी झाले.कोलगाव भोमवाडीत गिरबादेवीचे मंदिर असून, त्या ठिकाणी भोमवाडीतील सर्व कुटुंबे एकत्र येत ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम आखतात. भोजनानंतर काही ग्रामस्थ तेथून परतत असतानाच अचानक मंदिर परिसरातच मधमाश्यांनी ग्रामस्थांवर हल्ला चढविला. यामुळे ग्रामस्थ सैरावैरा धावू लागले. यातील काहीजण सुखरूपपणे बाहेर पडले; पण काही ग्रामस्थ मधमाश्यांच्या हल्ल्यात सापडले. यामध्ये तृप्ती जनार्दन साईल (वय ४०), भावेश चंद्रकात मुंड्ये (१०), मोहन नारायण खोत (६३), गौरी विजय पाटील (६), आनंदी राजन राऊळ (२८), हर्षदा प्रकाश गवळी (२५), कामिनी किरण राऊळ (३५), राजश्री राजाराम परब (६५), ज्योती किसन राऊळ (१६), अनिकेत सदानंद मुंड्ये (११), काशीबाई रमेश नाईक (५०), लीलावती विलास राऊळ (३८), संदेश अरुण राऊळ (२८), अक्षय जनार्दन साईल (२०), राजन नागेश राऊळ (३२), कुलदीप अरुण राऊळ (३०), किरण वसंत मेस्त्री (२३, सर्व रा. भोमवाडी कोलगाव) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)जखमींना सावंतवाडीतील कुटिर रूग्णालयात दाखल केल्यानंतर कोलगावातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून तीन ते चारजणांवर मधमाश्यांनी तीव्रतेने हल्ला केला होता.या हल्ल्यात तीन लहान मुलेही सापडली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटिर रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोलगाव ग्रामस्थांवर मधमाश्यांचा हल्ला
By admin | Published: April 09, 2015 11:59 PM