कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी ६६ हजार २६३ घरांमध्ये, तर ३७ सार्वजनिक मंडळांच्या गणरायांची विधिवत प्रतिष्ठापना केली असून, मोठ्या उत्साहात पूजन करण्यात आले. सकाळपासूनच अनेक घरांत गणरायाची मूर्ती आणण्यासाठी तसेच पूजनासाठी अबालवृद्धांची धावपळ सुरू होती. गुरुवारपासून घरोघरी ‘श्रीं’ चा जागर सुरू झाला आहे.काही ठिकाणी गुरुवारी ढोल-ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत ‘श्रीं’ची मूर्ती घरोघरी आणण्यात आल्या. ‘मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’ च्या गजराने आसमंत अगदी दुमदुमून गेल्याचा भास होत होता. गेले पाच दिवस अधून मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते; परंतु गुरुवारी सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली होती. दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तत्पूर्वीच अनेकांच्या घरी गणरायाचे आगमन झाले होते. पावसाचा व्यत्यय श्री गणेशमूर्ती घरी आणताना आला नसल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. घरोघरी विधिवत गणरायाचे पूजन करण्यात आले. ज्याठिकाणी पुरोहित उपलब्ध झाले, त्याठिकाणी त्यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करण्यात आले. त्यामुळे पुरोहितांची दिवसभर धावपळ सुरू होती. गणरायाच्या पूजनानंतर आरती करण्यात आली. तसेच एकविस मोदकांसह इतर पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी पुन्हा घरोघरी आरती झाल्यानंतर काही ठिकाणी भजनही करण्यात आले. हा उत्साह पुढील काही दिवस असाच टिकून राहणार आहे. दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन शुक्रवारी करण्यात येणार आहे. (वार्ताहर)अधूनमधून पावसाच्या सरीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेले तीन दिवस सिंधुदुर्गात दाखल झालेल्या पावसाने गणेशोत्सवाच्या दिवशीदेखील अधूनमधून कोसळत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गणपती घरी आणताना भाविकांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती.सिंधुदुर्गात लाखो भाविक दाखलसिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाला भावपूर्ण वातावरणात गुरुवारी प्रारंभ झाला. या उत्सवाच्या निमित्ताने घरोघरी लगबग सुरू आहे. कोकण रेल्वे, एस. टी., खासगी बसेस तसेच इतर वाहनांनी सिंधुदुर्गात सुमारे पाच लाख भाविक दाखल झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. यात मुंबईकरांचे प्रमाण जास्त आहे.
‘श्रीं’च्या जागराला सुरुवात
By admin | Published: September 17, 2015 10:08 PM