कणकवली :शाळा कधी सुरू होणार ? याची हुरहूर विद्यार्थ्यांच्या मनाला लागलेली असतानाच अखेर सोमवारी शाळेची घंटा वाजली. शासनाने कोरोनाविषयक नियम पाळून इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या केलेल्या सूूचनेनुसार कणकवली तालुक्यात माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाली. मात्र कोरोनाबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या संभ्रमामुळे विद्यार्थ्यांनी काही प्रमाणात शाळेत व महाविद्यालयाकडे पाठच फिरविल्याचे चित्र दिसत होते.विद्यार्थ्यांची २० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती पहिल्या दिवशी नव्हती. मात्र, विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांनीकोरोनाविषयक उपाययोजनांचे नियोजन चांगल्या प्रकारे केल्याचे दिसत होते. तशा सूचनाही विद्यार्थी व शिक्षकांना संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्यानी दिल्या होत्या.शहरातील विद्यामंदिर हायस्कुलमध्ये सकाळीच काही अंशी विद्यार्थी येण्यास सुरुवात झाली होती. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावरसॅनिटायझर कक्ष तैनात करण्यात आला होता.तसेच विद्यार्थी व शिक्षकांचे थर्मल गनने तापमान तपासण्यात येत होते. विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी कोरोना विषयक घ्यावयाच्या काळजीचे फलक लावण्यात आले होते.विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने एक दिवसा आड नियमित विद्यार्थ्यांचे वर्ग घेत गर्दी टाळण्याचे नियोजन करण्यात आले आहे.विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील ९ वी व १० वी मधील २८९ विद्यार्थ्यांपैकी ६७ विद्यार्थ्यांनी हजेरी दर्शवली होती.तर २० शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे शिक्षकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असलेल्यानाच शाळेत प्रवेश देण्यात आला होता.तर वर्गामध्ये एका बेंचवर एकच विद्यार्थी अशा ५० टक्के उपस्थित हा वर्ग भरवला होता.अशा प्रकारे आवश्यकती दक्षता घेण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक सरवदे यांनी दिली. तर कणकवली कॉलेज मध्ये ११ वी व १२ वी मध्ये एकूण १२०० विद्यार्थी असून यातील १५० च्या आसपास विद्यार्थी हजर होते.तर उर्वरित विद्यार्थ्यांनी घरी रहाणे पसंत केले.कोरोना बाबत मुंबई,पुणे येथील परिस्थितीचा आढावा घेत रुग्ण वाढत असल्याचे शासना मार्फत सूतोवाच करण्यात आल्याचा परीणाम दिसत होता.त्याच प्रमाणे सिंधुदुर्गात विद्यालये सुरू करण्याबाबत स्पष्ट प्रकारच्या सूचना नसल्याचा ही परिणाम जाणवत होता.तर ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने कणकवली कॉलेजमध्ये शिकत असून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातुन कणकवलीमध्ये येण्यासाठी एस टी वाहतूक पुरेशी नाही तसेच पास सुविधा नाही.अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना येणे जोखमीचे बनले आहे.यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला.अशाच प्रकारचे चित्र विद्यालयामध्येही दिसत होते.
कोरोना पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत बोलतांना कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र चौगुले यांनी महाविद्यालयातील शिक्षक व स्टाफ यांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नियमावली तयार करण्यात आली असल्याचे सांगितले.शिक्षक अहवालाच्या प्रतीक्षेत !अनेक शिक्षकांनी कोरोनाच्या चाचणीसाठी स्वॅब दिले असून ते अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. या अहवाला नंतरच शाळेत जाण्याबाबतचा निर्णय ते घेऊ शकणार आहेत.