कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील अखिल भारतीय समन्वित तेलताड प्रकल्पाला सन २०१४-१५ या वर्षाकरिताचे अखिल भारतीय पातळीवर ताड पिकांतर्गत संशोधन कार्य सुरू असणाऱ्या २९ संशोधन प्रकल्पांमधून सर्वोत्कृष्ट प्रकल्पाचे पारितोषिक प्राप्त झाले असून हा प्रकल्प देशपातळीवरील क्रमांक १ चा प्रकल्प ठरला आहे. उद्यान विद्या महाविद्यालय, मुळदे (तत्कालीन कृषी संशोधन केंद्र, मुळदे) येथे अखिल भारतीय समन्वित तेलताड योजनेंतर्गत तेलताड संशोधन प्रकल्पाची सुरुवात सन १९८८ या वर्षी झाली. तेव्हापासून हा प्रकल्प येथे कार्यान्वित असून, तेलताड या पिकावर चांगल्या प्रकारचे संशोधन करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण पाच प्रकारचे प्रयोग सुरू असून भारतात पहिल्यांदाच तेलताड पिकात इतर पिकांची लागवड करून आंतरपिकांचा प्रयोग घेण्यात आला आहे. या प्रयोगाचे आजपर्यंतचे निष्कर्ष अत्यंत चांगले असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास तेलताड पिकाच्या शेतीत हे निष्कर्ष मैलाचा दगड ठरून या शेतीत अभूतपूर्व क्रांती होऊ शकेल. मे २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात गोवा राज्यात अखिल भारतीय पातळीवर ताड गटांतर्गत संशोधन कार्य सुरू असलेल्या प्रकल्पाची वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व प्रकल्पांचे विश्लेषण करून उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील तेलताड प्रकल्पाची निवड देशातील सर्वोत्कृष्ट ताड प्रकल्प म्हणून करण्यात आली. यावेळी प्रकल्पाचे प्रमुख प्रा. महेंद्र गवाणकर यांना प्रकल्पाकरिताचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे प्रमाणपत्र त्यांनी उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी या प्रकल्पात अत्यंत उत्कृष्ट काम करून हा प्रकल्प देशपातळीवर प्रथम क्रमांकावर नेण्याकरिता प्रयत्न केल्याबाबत प्रकल्पप्रमुख प्रा. गवाणकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा डॉ. हळदणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मत्स्यवैज्ञानिक डॉ. नितीन सावंत, शिक्षण प्रभारी डॉ. उदय आपटे, हवामानावर आधारीत कृषी सल्ला योजनेचे प्रा. राजेश मुळ्ये, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रा. नवीन राठोड, प्रा. विजय दामोदर तसेच उद्यानविद्या महाविद्यालय व संशोधन प्रकल्पांचे सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुळदेतील तेलताड प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट पारितोषिक
By admin | Published: June 07, 2015 12:44 AM