श्रीपाद नाईक : वेंगुर्लेत कोटणीस समितीतर्फे हर्बल गार्डनचे भूमिपूजर्न वेंगुर्ले : डॉ. कोटणीस समितीने सोडलेल्या संकल्पासाठी वैद्यकीय उपचार केंद्राचा प्रकल्प मोठा होण्यासाठी सर्वांचेच एकजुटीने सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी आपले पूर्ण वैयक्तिक सहकार्य राहील तसेच आयुर्वेदिक, निसर्गोपचार, योगा या उपचार पद्धतीसाठी डॉ. कोटणीस समितीसह जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितरित्या मागणी केल्यास त्या मागण्या राज्य सरकारशी चर्चा करुन आपण सोडविन, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी वेंगुर्लेत आयोजित कार्यक्रमात केले. येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात डॉ. द्वारकानाथ कोटणीस समितीतर्फे डॉ. कोटणीस यांच्या १0५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय उपचार केंद्राचा प्रारंभ, हर्बल गार्डनचे भूमिपूजन, के.ई.एम.मुंबई हॉस्पिटलच्या पथकातर्फे संधीवात रुग्णांसाठी मोफत उपचार अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी आमदार राजन तेली, समितीचे अध्यक्ष दादासाहेब परुळकर, समितीचे मुंबई सल्लागार व उद्योजक रघुवीर मंत्री, सचिव अतुल हुले, सदस्य मिलिंद तुळसकर, के.ई.एम.हॉस्पिटलचे डॉ. सुधीर जुवेकर यांचा समावेश होता. कोकणचा विकास सर्वांगीणदृष्ट्या झाला. दुर्दैवीरित्या आरोग्यदृष्ट्या कोकण मागासच राहीला अशी खंत खासदार विनायक राऊत व्यक्त करुन डॉ. कोटणीस समिती व वेंगुर्ले, मुंबईतील नागरिक जे प्रयत्न करीत आहेत त्या प्रयत्नासाठी आपलेही सहकार्य राहील, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली. या कार्यक्रमाची सुरुवात ओम योग साधना संस्थेच्या संचालक डॉ. वसुधा मोरे नियोजनबद्द केलेल्या योग साधनेच्या विविध प्रात्यक्षिकांची संगीताच्या तालावर प्रात्यक्षिके सादर करुन झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कोटणीस समितीचे डॉ. प्रल्हाद मणचेकर, सूत्रसंचालन समितीचे सचिव अतुल हुले व बॅ.नाथ पै कॉलेज कुडाळच्या शिक्षिका श्वेता खानोलकर यांनी तर आभार अतुल हुले यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता लायनेस सदस्या प्रार्थना हळदणकर यांनी सादर केलेल्या वंदे मातरम या गीताने झाली. यावेळी वेंगुर्ले पंचायत समिती सभापती सुचिता वजराठकर, माजी सभापती अजित सावंत, सदस्य सुनिल मोरजकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश नाईक, सेनानेते रमेश नाईक, चार्टर्ड अकाऊंटंट सुनिल सौदागर, सतिश डुबळे, माहिती अधिकारी संध्या गरवारे, नगरपरिषद मुख्याधिकारी रामदास कोकरे, लायनेस क्लबच्या सदस्या निला यरनाळकर, प्राची मणचेकर, कविता भाटीया, अॅड. सुषमा प्रभुखानोलकर, डॉ. अतुल मुळे, डॉ. संजिव लिंगवत, भाजपाचे प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, ओम योग साधनालयाच्या संचालिका डॉ.वसुधा मोरे यासह बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या नर्सेस व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी) पुरस्कार प्राप्तांचा गौरव वेंगुर्ले शहरातील १0२ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक काका खानोलकर, डॉ. कोटणीस सेवा पुरस्कार प्राप्त सावंतवाडी येथील डॉ. श्रीपाद जनार्दन कशाळीकर, डॉ.को-चिंग-लान कोटणीस स्मृती सेवा पुरस्कार प्राप्त कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधिपरिचारीका नझिमा पटेल, मुंबई के.ई.एम. हॉस्पीटलचे डॉ. सुधीर जुवेकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच श्रीपाद नाईक व खासदार राऊत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन समितीचे अध्यक्ष दादासाहेब परुळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वैद्यकीय उपचार केंद्रासाठी सर्वोतोपरी सहकाय
By admin | Published: October 10, 2015 11:44 PM