चिपळूण : कोणतेही क्षेत्र हे वाईट नसते. मात्र त्याकडे पहाण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन हवा. विद्यार्थ्यांनी स्वत:हन करीअरची संधी पाहायला हवी. राजकारणात उतरुन युवा वर्गाने समाज प्रबोधन करायला हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवारी) येथे केले.शहरातील डी. बी. जे. महाविद्यालयाच्या सेमीनार हॉलमध्ये ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. शाम जोशी, माजी आमदार बापू खेडेकर, भारतीय विद्यार्थी सेनेचे सचिन खरे, वैभव खेडेकर आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांकडे नेतृत्व गुण असायला हवेत. सकारात्मक दृष्टीकोन ठेवूनच अभ्यास करायला हवा. राजकारणात उतरल्याशिवाय समाज प्रबोधन होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार बनण्यासाठी कल्पकतेची आवश्यकता असते. राजकीय दृष्टीकोन आल्याशिवाय खरे व्यंगचित्रकार बनता येणार नाही. विद्यार्थी अथवा युवा वर्गाने भविष्याचा विचार करुन करीयरची संधी शोधायला हवी. यासाठी कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला झोकून देण्याची उमेद असली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यानी विचारलेल्या काही प्रश्नांना ठाकरे शैलीत उत्तरे दिली. राज ठाकरे यांचे बहाद्दूर शेखनाका येथे वैभव खेडेकर, उपजिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, शहर अध्यक्ष कपील शिर्के , माजी शहर अध्यक्ष राकेश घोरपडे, रविकांत काणेकर, सुनील मोडक, प्रशांत परब, महिला तालुकाध्यक्ष अंजली कदम, महिला शहराध्यक्ष स्मिता काणेकर आदीसह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. (वार्ताहर)कोकण दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सवतसडा येथील धबधब्यास भेट दिली. निसर्गरम्य अशा धबधब्याचे विलोभनीय दर्शन त्यांनी घेतले. शासकीय विश्रामगृह येथ मनसेची सध्याची स्थिती त्यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून जाणून घेतली. संघटना अधिक बळकट कशी होईल या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले.
सकारात्मक राहिल्यास उत्तम करिअर : राज ठाकरे
By admin | Published: June 23, 2015 12:50 AM