अनंत जाधव ल्ल सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम व रस्ते महामार्ग विभागाने भविष्यात रस्त्याची कामे दर्जेदार होण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता प्रत्येक डांबर प्लँटवर शासनाने ‘स्काडा’हे नवीन तंत्रज्ञान बसविण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे रस्ते बनविण्यासाठी वापरण्यात येणारे डांबराचे तापमान थेट इंटरनेटच्या माध्यमातून बांधकाम विभागाला कळणार आहे. त्याचबरोबर डांबरामध्ये होणारी भेसळही रोखण्यास मदत होईल. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात पाच ठिकाणी हे मशीन बसविण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे रस्त्यात खड्डे पडणे, साईडपट्टी खचणे, पावसामुळे रस्ता वाहून जाणे असे प्रकार वरचेवर होत असतात. अनेक गावांमध्ये तर रस्ता केल्यानंतर एका वर्षातच तो खराब होतो. याच्या अनेक तक्रारी होतात, पण त्याची दखलही कोण घेत नाही. मात्र, अलीकडेच बांदा ते खारेपाटण या रस्त्याची झालेली दुर्दशा नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर जाणवल्याने बांधकाममंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली. गणेश चतुर्थीच्या काळात काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरण्यातही आले, पण ते फार काळ टिकले नाहीत.शासनस्तरावर सिंधुदुर्गमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची कामे दर्जेदार होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातूनच बांधकाम विभागाने स्थानिक पातळीवर रस्ता कामाची निविदा काढताना जो निविदा घेईल, त्या ठेकेदारासाठी नियमावली तयार करून देण्यात आली आहे.बांधकाम विभागाने विकसित केलेले स्काडा हे नवीन तंत्रज्ञान ज्या डांबर प्लँटमध्ये असेल, तेथूनच डांबर घेणे ठेकेदारावर बंधनकारक राहणार आहे. एखादा डंपर डांबर भरून रस्त्याच्या कामावर जाणार असेल, तर तत्पूर्वी त्या डांबराचे तापमान स्काडा मशीनद्वारे तपासण्यात येणार आहे. तसेच त्या डांबरात भेसळ आहे का हेही तपासण्यात येणार आहे. त्या मशीनचा संदेश बांधकाम विभागाला प्राप्त झाला, तरच ते डांबर ग्राह्य मानले जाणार आहे,अन्यथा त्या ठेकेदाराला त्याचा भुर्दंड कामाच्या निघालेल्या बिलातून बसणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच डांबर प्लँटमध्ये हे तंत्रज्ञान बसविण्यात आले असून, त्याला बांधकाम विभागाशी जोडण्यात आले आहे. तसेच एखादा डंपर डांबर घेऊन रस्त्यावर जाण्यापूर्वी त्याचा संदेश बांधकाम विभागाबरोबरच कार्यकारी अभियंत्यांनाही प्राप्त होत असतो. या नवीन उपाययोजनेमुळे रस्त्याच्या कामात अतिवृष्टीच्या नावाखाली सुरू असलेला डांबराचा घोळ कमी होणार असून, डांबराचा दर्जाही योग्य राहणार आहे. तसेच रस्तेही दर्जेदार होणार आहेत. हे नवीन तंत्रज्ञान एक महिन्यापासून अमलात आणण्यात आले आहे. त्याचा वापर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी सुरूही केला आहे.
दर्जेदार रस्त्यांसाठी ‘स्काडा’ची सक्ती
By admin | Published: January 01, 2017 11:06 PM