सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या पंधरा वर्षात जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केली आहे. त्यामुळेच त्यांना संधी असून ही एक प्रकल्प आणता आला नाही. किंवा लोककल्याणासाठी काही करता आले नाही. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यावे का याचा विचार मतदारांनी करावा असे आवाहन माजी मंत्री प्रविण भोसले यांनी केले.आजगाव येथील मायनिंग प्रकल्पाचा पुनर्विचार करण्यात यावा मुठभर रोजगारासाठी वीस गावे देशोधडीला लावणार आहात का? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर आपली भुमिका स्पष्ट केली.भोसले म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रीमंडळात मी मंत्री म्हणून काम करत असतना अनेक प्रकल्प आणले आणि ते पूर्ण ही केले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय असो किंवा आयटीआय फलोत्पादन योजना अशा कामाची नावे आजही घेतली जातात. पण केसरकर यांनी मागील पंधरा वर्षात काय केले याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. फक्त जनतेची फसवणूक करण्याशिवाय ते काही करू शकले नाहीत. त्यामुळेच आज त्यांना गावात बंदी करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत असे कोणा विरोधात घडले नव्हते ते घडले आहे. याचा केसरकर यांनी विचार करावा असा सल्लाही भोसले यांनी दिला.जनतेची पदासाठी दिशाभूल करायची आणि या पक्षातून त्या पक्षात अन्यायाच्या नावाखाली जायचे. माझे याच्या बरोबर चांगले त्याच्या बरोबर चांगले म्हणायचे पण काय करायचे नाही. निवडणुका आल्या की बाजा पेटी आणि टबले द्याचे आणि त्यावर मते मागायची आता याचा जनतेने विचार केला पाहिजे नाहीतर हे जनतेस गृहीत धरून पुढे काहीच करणार नाहीत. आता कुठेतरी थांबवा आणि महाविकास आघाडीला संधी द्या असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.सावंतवाडी बसस्थानक साधे करता आले नाही ते मंत्री पदावर कसे बसू शकतात. पंचायत समिती इमारत फक्त केसरकर यांच्यामुळेच प्रलंबित राहिली. पंचतारांकित हॉटेल निर्माण करण्याचा पुढाकार तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतला पण आतापर्यंत पुढे काही झाले नाही आणि आता निवडणूक आली असल्याने भुमिपूजन करण्याची स्वप्ने बघत आहेत अशी टीकाही भोसले यांनी केली.
जनतेची फसवणूक करणाऱ्यापासून आतातरी सावध व्हा, प्रविण भोसले यांचे मतदारांना आवाहन
By अनंत खं.जाधव | Published: July 30, 2024 3:40 PM