सावंतवाडी : भाईसाहेब सावंत यांचा कोकणच्या विकासात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक दोन गुंठ्यात न करता ते भव्यदिव्य करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासाठी सावंतवाडी शहरात एक एकर जागेत हे स्मारक उभारण्यात येणार आहे. याची देखभाल नगरपालिका करेल, अशी माहिती महाराष्ट्राचे अप्पर मुख्य सचिव पी. एस. मीना यांनी दिली. याबाबत मीना यांनी सावंतवाडीत जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, रवींद्र बोंबले, तहसीलदार बी. बी. जाधव यांच्याशी बैठकही घेतली आणि त्यांना शासकीय जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत. भाईसाहेब सावंत यांच्या काळात पी. एस. मीना हे रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. या काळात भाईसाहेब सावंत यांची विकासाची धडपड वाखाणण्याजोगी होती. त्यांचा नेहमीच आम्ही आदर्श ठेवला आहे. त्यांचे याठिकाणी अद्ययावत स्मारक झाल्यास त्यांना ही श्रद्धांजलीच असेल, असे सांगत माजगाव येथे दोन गुंठ्यात स्मारक करण्याचा शासनाचा पूर्वी विचार होता. पण, दोन गुंठ्यात फक्त पुतळा होईल. बाकीचे काही होणार नसल्याने आता हा निर्णय आम्ही बदलला असल्याचे मीना यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी शहरात शासकीय जागा शोधण्याचे काम सुरू करण्यात येणार असून, एक एकर जागेत हे स्मारक आम्हाला उभे करायचे आहे. यासाठी दोन कोटींचा निधी यापूर्वीच देण्यात आला आहे. उर्वरित निधी काम सुरू होईल तसा देण्यात येणार आहे. हे स्मारक पुतळ्यापुरते मर्यादित असणार नसून, यात अद्ययावत संगणकीय गं्रथालय, हॉल, विश्रामगृह, मुलांना शिकण्यासाठी संगणक क्लासरुम अशा विविध सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच स्मारकाबाबत नागरिकांनी सूचना केल्यास त्या सूचनांचाही समावेश यामध्ये करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, नगरपालिकेकडे एक एकर जागेची मागणी करण्यात येणार असून, तसा ठराव करून घेण्यात येणार आहे. हे काम तातडीने सुरू करण्यात येणार असून, स्मारक अद्ययावत होण्यासाठी आमचा प्रयत्न राहाणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सावंतवाडीत भाईसाहेबांचे स्मारक!
By admin | Published: October 24, 2015 11:34 PM