कणकवली : दिगंबरा, दिगंबरा, भालचंद्र बाबा दिगंबराच्या जयघोषाने रविवारी सायंकाळी कणकवलीनगरी दुमदुमून गेली. निमित्त होते ते येथील श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराजांच्या ४० व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहरातून काढण्यात आलेल्या सवाद्य पालखी मिरवणुकीचे. अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.२२ नोव्हेंबरपासून येथील आश्रमात परमहंस भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला होता. रविवारपर्यंतच्या कालावधीत याठिकाणी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काकडआरती, समाधी पूजन, भालचंद्र महारुद्र महाअभिषेक अनुष्ठान, आरती, भजने, कीर्तन महोत्सव तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.
रविवारीही पुण्यतिथी दिनानिमित्त पहाटे ५ वाजल्यापासून काकड आरतीने धार्मिक विधींची सुरुवात झाली. परमहंस भालचंद्र महाराजांच्या मूर्तीवर किरणोत्सवही करण्यात आला. हा सोहळा पाहताना अनेक भाविकांनी आपल्या डोळ्यांचे पारणे फिटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. शहरातील तेलीआळी येथील सुदर्शन मित्रमंडळ, बाजारपेठेतील महापुरुष मित्रमंडळ, रिक्षा संघटना, शिवाजी चौक मित्रमंडळ तसेच इतर अनेक मंडळांनी पालखी मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार तसेच चहा-पाण्याची सोय केली होती.
नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा सुबक अशी रांगोळी काढली होती. विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. अनेक मंडळांनी परमहंस भालचंद्र महाराजांच्या जीवनावरील देखावेही पालखी मिरवणुकीच्या मार्गावर चौका-चौकात उभारले होते. त्यामुळे शहरातील संपूर्ण वातावरणच भक्तिमय बनले होते.
पालखी मिरवणूक रात्री पुन्हा आश्रमात आल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर हळवल येथील श्री भालचंद्र दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग झाल्यावर या पुण्यतिथी उत्सवाची सांगता करण्यात आली. या पुण्यतिथी महोत्सवासाठी गोवा, मुंबई, पुणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील अनेक भाविक कणकवलीत दाखल झाले होते.
वारकऱ्यांच्या साथीने सवाद्य पालखी मिरवणूकरविवारी सायंकाळी ५.३० वाजल्यानंतर कणकवली शहरातून परमहंस भालचंद्र्र महाराज यांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घोडे, उंट तसेच वारकऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या पालखी मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते. भाविकांनी केलेल्या भालचंद्र्र नामाच्या जयघोषाने कणकवलीनगरी दुमदुमून गेली होती.