मच्छिंद्र मगदूम -सांगरूळकोल्हापूरपासून केवळ पन्नास किलोमीटरवर डोंगरात एक वाडा आहे. हा वाडा म्हणजे राजवाडा नव्हे, तर तो भेंडाई धनगरवाडा. तिथे २६ कुटुंबे राहतात. त्यांची लोकसंख्या २५० इतकी आहे. ते आजतागायत कुडाच्या आणि दगडमातीच्या घरातच राहतात. राहणे असो वा उदरनिर्वाह, रस्ता असो वा पाणी, या प्रश्नांना ते कधी भिडलेच नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही मूलभूत सुविधांपासून हा वाडा वंचितच आहे. यामुळे या धनगरवाड्यावर विकासाची पहाट कधी उगवणार, याची वाट पाहत आहेत.मूलभूत सुविधांच्या समस्यांसह उदरनिर्वाहाच्या गर्तेत तो सापडला आहे, याची जाणीव तेथे पोहोचल्यानंतर होते. या धनगरवाड्यावर विकासाचा प्रकाश कधी पडेल, असा प्रश्न उपस्थित होतो. एकीकडे शहरापाठोपाठ ग्रामीण भागात आता ‘विकास’ या गोंडस संकल्पनेतून रो-बंगलो, अपार्टमेंट संस्कृती जोपासली जात आहे. प्रत्येक कुटुंब आता किमान हक्काचं घर असावं, यासाठी झटत आहे. यामुळे घराची जागा निवडताना किंवा घर बांधताना प्रत्येक कुटुंब घरापर्यंत रस्ता, पाणी, वीज, शाळा, रुग्णालय, दुकाने यांसारख्या अनेक मूलभूत गरजांची पूर्तता होईल, असे ठिकाण आहे काय, याचा विचार करीत आहे.याउलट भेंडाई धनगरवाड्यावरचा नागरिक अनेक समस्यांच्या गर्तेत जीवन जगतो आहे. तरीही त्यांनी कधीच हार मानली नाही. जिथे ते राहतात, तिथे ये-जा करण्यासाठी सरळ रस्ताही नाही. धनगरवाड्यावर एकूण २६ कुटुंबे वास्तव्य करतात. त्यापैकी १६ कुटुंबे पन्हाळा तालुक्यातील वेतवडे ग्रामपंचायतीला जोडली आहेत, तर राहिलेली दहा कुटुंबे करवीर तालुक्यातील उपवडे ग्रामपंचायतीला जोडली आहेत. त्यामुळे हा धनगरवाडा दोन ग्रामपंचायती व दोन तालुक्यांना जोडला आहे. त्यामुळे गावात विकासकामे करायची कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उदरनिर्वाहासाठी जमीन नाही. घरापर्यंत पिण्याचे पाणी नाही. विजेचा लपंडाव नेहमी सुरू असतो. पुरेसे पाणी नाही. डोंगरात झऱ्यावर विहीर बांधली आहे. मात्र, पाणीपुरवठा करण्यासाठी मोटार किंवा इंजिनची व्यवस्था नाही. आजही विहिरीवर दोराने खेचून पाणी काढावे लागते. पाण्यासाठी डोंगरातून पायपीट करावी लागते. दवाखाना इथपर्यंत पोहोचला नाही, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर नेहमीच ‘आ’ वासून उभे आहेत.हा धनगरवाडा वसला आहे, तो उंच डोंगरात, जंगलामध्ये. करवंद, जांभूळ, लाकूडमोळ्या, वनऔषधी वनस्पती विकून पैसे मिळविणे हाच त्यांचा उदरनिर्वाहाचा मुख्य मार्ग. याला जोड मिळते ती गाय, म्हैस, शेळ्यांची. इथला पुरुष जगण्यासाठी दिवसभर गावोगावी भटकतो अन् महिलांची दिवसभर भटकंती पाण्यासाठी. एक किलोमीटरची पायपीट केल्यानंतर पाणी मिळते, तेही झऱ्याचे. कडक उन्हाळ्यात त्याचाही तुटवडा जाणवतो. धनगरवाडा डोंगरात, जंगलात वसल्याने येथे गवा, बिबट्या व वन्यप्राण्यांची भीती आहे. मात्र, ते या भीतीला कधीच भीक घालत नाहीत.धनगरवाड्यावर नवीन शाळेची इमारत बांधली आहे. मात्र, दिवसभर पाण्यासाठी भटकणाऱ्या मुलांची शाळेकडे नेहमी पाठ असते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक निवडणुका झाल्या. या काळातील लोकप्रतिनिधी इथपर्यंत कधी स्वत: पोहोचले असतील का? असा प्रश्न इथे आल्यावर पडतो. वेतवडे ग्रामपंचायतीने रस्ता करण्याचा प्रयत्न केला; पण तेही काम अर्धवट थांबले. यामुळे भेंडाई धनगरवाड्यावर विकासाची पहाट उगवणार कधी? असा प्रश्न येथील ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे.भेंडाईचा धनगरवाडा एकत्रित एका ग्रामपंचायतीला जोडून संपूर्ण गाव पासार्डे पैकी पाचाकटेवाडीला जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच रस्ताही पाचाकटेवाडीला जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पाण्याची योजनाही तत्काळ पूर्ण करून पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनासमोर आपली भूमिका मांडणार असून, भेंडाईच्या धनगरवाड्यावर विकासकामे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - राजेंद्र सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्यधनगरवाड्यावर काय हवेये-जा करण्यासाठी पक्का रस्तारस्ता पाचाकटेवाडीला जोडावाधनगरवाडा पासार्डे पैकी पाचाकटेवाडी ग्रामपंचायतीशी जोडावा व करवीर तालुक्यात समावेश व्हावापिण्याच्या पाण्याची सोय व्हावीउदरनिर्वाहासाठी शेतजमीन मिळावी
भेंडाई धनगरवाड्यावर विकासाची पहाट कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2015 9:34 PM