आॅनलाईन लोकमत सिंधुदुर्गनगरी दि. 0८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आला. येथील सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात आयोजित समारंभात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक के. बी. जाधव, समाज कल्याण निरिक्षक धर्मराज गोसावी महामंडळाचे समन्वयक नंदकिशोर सावळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या सप्ताहाचा प्रारंभ झाला.
८ एप्रिल ते १४ एप्रिल २0१७ या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
प्रारंभी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी सप्ताहात आयेजित कार्यक्रमांची सविस्तर माहिती देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या सप्ताहानिमित्त रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती प्रचार कार्यशाळा, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान, समाज प्रबोधनपर विषयावर व्याख्यान, आदी कार्यक्रम होणार आहेत. या सप्ताहाचा सांगता समांरभ १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय भवनात होणार आहे. या समारंभास अधिकारी - कर्मचारी बंधू-भगिनी, आश्रमशाळेतील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.