ओरोस : नोंदीत घरेलू कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, प्रसुती लाभ, अंत्यविधीसाठी रक्कम, किमान वेतन, घरेलू कामगारांच्या कुटुंबियांसाठी वैद्यकीय सुविधा, पेन्शन योजना, ओळखपत्र, आॅनलाईन नोंदणी आदी घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी सोमवारी भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गच्यावतीने ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.ओरोस येथे सोमवारी घरेलू कामगार भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. नोंदीत घरेलू कामगारांना शासनाने विविध लाभ मंडळामार्फत जाहीर केले. तरी आजपर्यंत या विविध योजनांचा लाभ व अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांच्या कुटुंबियांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे. यामध्ये घरेलू कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे मानधन सन २०१३-१४चे प्राप्त झालेले नाही. नोंदीत घरेलू कामगारांचा मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना अद्याप मृत्यू क्लेमची मंडळाने दिलेली रक्कम पोच नाही त्यांच्या वारसांना तत्काळ मदत व्हावी. प्रसृती महिलांना नोंदणीनंतर ५ हजार रूपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे, असे सरकारी आदेश असताना घरेलू कामगारांना लाभ देण्याच्यादृष्टीने कार्यवाही झालेली नाही.महाराष्ट्रात ज्या महिला व पुरूष घरेलू कामगार म्हणून काम करतात त्यांना संबंधित ठेकेदार, मालक यांच्याकडून तुटपुंजे वेतन देऊन त्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे हे कुटुंब आपल्या मुलाबाळांच्या उदरनिर्वाहात कमी पडते. त्यामुळे कायदेशीर या योजनांचा फायदा जर घरेलू कामगारांना मिळाला तर कुटुंब व्यवस्थित सांभाळू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगार अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत. कामगारांनी नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्याच्या आत ओळखपत्रे कामगारांना देण्यात यावीत, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी ४६० महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर घरेलू कामगार मजदूर संघाच्यावतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष भगवान साटम, सरचिटणीस हरी चव्हाण, प्रसाद गावडे आदी मोर्चात सामील झाले होते. (वार्ताहर)
भारतीय मजदूर संघाचा मोर्चा
By admin | Published: December 15, 2014 10:10 PM