माणगाव : माणगाव-आंबेरी तळावर गेले सहा महिने जेरबंद असलेला भीम हत्ती मंगळवारी सकाळी दहा वाजता कर्नाटकातील नागरमोळ येथील मतिगुड नॅशनल पार्कमध्ये रवाना झाला. भीमला निरोप देण्यासाठी आंबेरी ते माणगाव तिठ्ठ्यापर्यंत ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भावपूर्ण वातावरणात वंदन केले. गेली अनेक वर्षे माणगाव खोरे हत्तींमुळे चर्चेत होते. हत्तींनी केलेल्या जीवितहानी व शेतीपिकांच्या नुकसानीने येथील शेतकरी त्रस्त झाला होता. नुकसानग्रस्तांच्या मागणीनुसार या भागात हत्तीपकड मोहीम राबविण्यात आली. यातीलच गणेश व समर्थ हत्तींचा मृत्यू ग्रामस्थांना कमालीचा भावनिक करून गेला, तर आज भीम हत्ती कर्नाटकात जाताना याच ग्रामस्थांना गहिवरून आले. फेब्रुवारी महिन्यात भीम हत्तीला पकडून आंबेरीत आणले होते. तेव्हापासून सहा महिने दोन दिवस त्याचा मुक्काम येथे राहिला. या काळात येथील ग्रामस्थांना व कर्मचाऱ्यांनाही त्याचा लळा लागला होता. त्याच्या पायाला झालेली जखम वाढू नये व त्यातून काही विपरीत घडू नये यासाठी त्याला तत्काळ कर्नाटकात पाठविण्यासाठी सर्वांचा आग्रह होता. कारण यापूर्वी गणेश व समर्थ हत्तींचे येथे निधन झाले होते. त्यामुळे भीम तरी प्रशिक्षण घेऊन सिंधुदुर्गात परत यावा व पर्यटन वाढावे, हा यामागचा हेतू होता. भीमला ट्रकमध्ये चढविण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासून मोहीम राबविण्यात आली. आंबेरीतच रॅम्प तयार करण्यात आला होता. मात्र, त्यात पाणी पडल्यामुळे दुसरा रॅम्प तयार करण्यात आला. त्याठिकाणी ट्रक रुतल्यामुळे आंबेरी-निवजे घावनाळे तिठ्ठ्यावर घळणीला ट्रक लावून बऱ्याच प्रयत्नांनंतर भीमला ट्रकमध्ये चढविण्यात यश आले. लक्ष्मी हत्तीण अमरावती मेळघाटला रवाना झाली. दोन्ही हत्तींसोबत डॉक्टरांच्या टीमसह वनकर्मचाऱ्यांची टीम असून, हत्तींना वाटेत लागणारे खाद्यही सोबत घेण्यात आले आहे. यावेळी मुख्य वनसंरक्षक एस. के. राव यांच्यासह उपवनसंरक्षक रमेशकुमार, प्रकाश बागेवाडी, प्रकाश बागडी, संजय कदम, आर. एस. कांबळी, वन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुन्हा महाराष्ट्रात!भीमला आठ महिने कर्नाटकात ठेवले जाणार असून, त्यानंतर महाराष्ट्रात आणले जाईल; परंतु सिंधुदुर्गातच आणले जाईल का? या प्रश्नावर त्यावेळी जो निर्णय घेण्यात येईल, त्यावरून ते ठरविले जाईल. आता आपण याबाबत काही बोलू शकत नसल्याचे मुख्य वनसंरक्षक आर. के. राव यांनी सांगितले.
‘भीम’ हत्ती कर्नाटकात रवाना
By admin | Published: August 11, 2015 11:03 PM