माणगाव : भीम हत्तीच्या पायाच्या जखमेमुळे व गणेश आणि समर्थ हत्तींच्या दुर्दैवी मृत्यूमुळे वनविभागाने भीम हत्तीला कर्नाटकातील नागरगोळे मतिगुड नॅशनल पार्कमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता ‘अभिमन्यू’ हा प्रशिक्षित हत्ती आंबेरी येथे दाखल झाला. डॉ. उमाशंकर यांची टीमही दाखल झाली आहे. उद्या, मंगळवारी दुपारी ही टीम भीमला घेऊन कर्नाटकातील मतिगुड नॅशनल पार्कमध्ये जाण्यास निघणार आहे. दोन ते तीन महिने प्रशिक्षण झाल्यावर पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वन विभागाकडे भीमला सोपविण्यात येणार आहे. डॉ. उमाशंकर यांच्या सोबत त्यांचे मदतनीस करिमभैय्या व बाबुराव मोरे, अभिमन्यूचा माहुत वसंता अशी दहा जणांची टीम दाखल झाली आहे. आंबेरीत आल्याबरोबर डॉ. उमाशंकर यांनी भीम हत्तीच्या पायाची जखम पाहिली व दोन ते तीन महिन्यात भीम पूर्ण प्रशिक्षित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोमवारी रात्री ‘लक्ष्मी’ हत्तीण अमरावतीला आणि ‘भीम’ सुध्दा जाऊ शकतात.उपवनसंरक्षक रमेशकुमार यांनी महिना पन्नास हजार रुपयांप्रमाणे तीन महिन्यांचे दीड लाख रुपये कर्नाटक सरकारकडे भीम हत्तीच्या प्रशिक्षणासाठी जमा केले आहेत. भिम हत्तीच्या प्रशिक्षणासाठी किमान सहा महिने कालावधी अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
भीम हत्ती निघाला कर्नाटकात
By admin | Published: August 11, 2015 12:22 AM