सिंधुदुर्ग - संतोष परब मारहाण प्रकरण आणि नंतर झालेल्या कोर्ट कचेरीमुळे गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये चुरशीची लढत होत आहे. दरम्यान, या मतमोजणीत शिवसेना आणि महाविकास आघाडीला एक मोठा धक्का बसला असून, शिवसेना नेते आणि विद्यमान जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभवाचा धक्का बसला आहे. मतमोजणीमध्ये समसमान मतं पडल्यानंतर ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात आलेल्या निवडीमध्ये भाजपा पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विठ्ठल देसाई यांनी सतीश सावंत यांचा पराभव केला आहे.
आज झालेल्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीच्या समृद्धी सहकारी पॅनेलचे प्रमुख आणि शिवसेना नेते तसेच विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकारी पॅनेलचे उमेदवार विठ्ठल देसाई यांच्यात चुरशीची लढत झाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली. अखेर या लढतीचा निकाल ईश्वरचिठ्ठीद्वारे लागला. त्यामध्ये विठ्ठल देसाई यांनी बाजी मारली.
दरम्यान, आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपा पुरस्कृत पॅनेलने आठ जागांवर विजय मिळला आहे. तर महाविकास आघाडीच्या पॅनेलला आथापर्यंत ५ जागा मिळाल्या आहेत.