वैभव साळकर / दोडामार्ग बाजारपेठेतील अरुंद रस्ते, बेशिस्तपणे उभ्या करून ठेवल्या जाणाऱ्या दुचाकी, त्यामुळे वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी या समस्यांवर मात करण्यासाठी प्रथमत: बाजारपेठेचे विस्तृतीकरण करण्याची गरज आहे. मात्र, मागील काही वर्षात ग्रामपंचायतीचा कारभार हाकणाऱ्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडे दूरदृष्टीचा अभाव राहिल्याने शहरातील मोक्याच्या जागा अनेक शासकीय इमारतींसाठी हस्तांतरीत करण्यात आल्या. परिणामत: आजच्या घडीला नगर पंचायतीकडे मोक्याच्या ठिकाणी अशी स्वमालकीची जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे बाजारपेठेचे विस्तृतीकरण करताना नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांसमोर अनेक आव्हाने उभी राहणार आहेत. भाजी विक्रे ते, मच्छिमार्केट आदीसाठी स्वतंत्र इमारती बांधण्यासाठी जागा निवडताना पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. दोडामार्ग शहरातच बाजारपेठ वसली आहे. शहरातील दोडामार्ग, बांदा, आयी, तिलारी या हमरस्त्यांच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजारपेठ व्यापली आहे. या दुकानात खरेदीसाठी जाताना वाहनचालक रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करतात. शिवाय दुचाकीदेखील बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात आणि खरेदीसाठी दुकानांमध्ये शिरतात. मात्र, बाजारपेठेतून जाणारे रस्ते हे मुळातच अरुंद असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामत: त्याचा त्रास बाजारपेठेतील नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे एकाच ठिकाणी व्यापाऱ्यांना बसविण्याची गरज आहे. जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मात्र, बाजारपेठ वसवायची कोठे, हा प्रश्न आहे. शिवाय बाजारपेठ विस्तृतीकरणाची समस्यादेखील आहेच. या सर्वांवर मात करायची कशी, असा प्रश्न नव्याने निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसमोर उभा आहे. शहरात ग्रामपंचायतीच्या ताब्यात अनेक ठिकाणच्या जमिनी होत्या. मात्र, तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याने त्यांनी स्वत:च्या ताब्यातील जमिनी या आयटीआय, पंचायत समिती, तहसीलदार निवासस्थान अशा कार्यालयांसाठी हस्तांतरीत केली. त्यामुळे आजच्या घडीला नगर पंचायतीत रुपांतर होताना ग्रामपंचायतीकडे स्वमालकीची जागा उपलब्ध नाही. परिणामत: भविष्यात दोडामार्ग शहरातील बाजारपेठ एकाच छताखाली आणावयाची झाल्यास तशी जागा नसल्याने बाजारपेठ विस्तृतीकरणाची समस्या निर्माण होणार आहे.
विस्तृतीकरणाचे मोठे आव्हान
By admin | Published: June 14, 2015 12:48 AM