कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ओसरगाव येथील प्लांट वर गोडावूनला शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. या आगीत सुमारे पाच कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कणकवलीसह जिल्ह्याभरातील नगरपंचायत आणि नगरपालिकांचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर काहीसे नियंत्रण आणता आले . तरीही तीन तास आगीचा भडका सुरू होता .
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी दिलीप बिल्डकॉन गेले दोन वर्ष रुंदीकरणाचे काम करीत आहे . यासाठी महामार्गालगतच्या ओसरगाव येथे अडीच ते तीन एकर जागेत वाहने उभी करणे , दुरुस्ती करणे यासाठी वर्कशॉप तसेच गोडावून तयार करण्यात आले होते. या जागेत कंपनीची हजारो वाहने सी पी पोकलँड अशी अत्याधुनिक यंत्रणा उभी करण्यात आली होती .दिवाळी असल्याने गेले दोन दिवस महामार्गाचे काम बंद आहे . वाहनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी भव्य अशी पत्र्याची शेड याठिकाणी उभारण्यात आली आहे . या शेडच्या आत मध्ये विविध मशनरी त्यांचे आठशे ते हजारहुन अधिक टायर तसेच वाहनांना लागणारे ऑईलची पिंपे ठेवण्यात आली होती.या शेडच्या आतील भागात विजेच्या शॉर्टसर्किटने अचानक आग लागली . आगीची माहिती दिलीप बिल्डकॉनच्या व्यवस्थापकांनी कणकवली पोलिसांना दिली . तसेच आगीची माहिती समजताच कणकवली नगरपंचायतचा अग्निशामक बंब, कुडाळ एमआयडीसीतील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे आग काही प्रमाणात आटोक्यात आणण्यास मदत झाली.कंपनीच्या कामगारांनी ही आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सुरुवातीला शेडचा पत्रा कापून जळणारा सगळा भाग स्वतंत्र केला .त्यानंतर कंपनीच्याच टँकरमधून पाणी मागवले. वाळूच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू होता. याठिकाणी जस जसे पाणी मारले जात होते तसा आगीचा भडका जास्तच उडत होता. घटनास्थळापासून काही अंतरावर आगीचे लोळ आणि धूर दिसत होता .कणकवलीचे नगरसेवक अबिद नाईक यांच्या मालकीचा क्रशर या घटनास्थळावरुन काही अंतरावर आहे . तेथे लक्ष्मीपूजनासाठी ते गेले होते. त्यांनी घटनास्थळी पोहोचून जिल्ह्याभरातील अग्निशमन बंब बोलावले . त्याचप्रमाणे ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांनीही आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यास सहकार्य केले. आमदार वैभव नाईक तसेच अन्य लोकप्रतिनिधी यांनीही भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एस.ओटवणेकर यांनीही पथकासह पाहणी केली.