रत्नागिरी : कीर्तनसंध्या परिवारातर्फे बुधवारपासून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे कीर्तन शहरातील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सुरू आहे. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी गणेशपूजन व शिवछत्रपतींचे पूजन करण्यात आले. ‘मराठेशाहीची देशव्यापी झुंज’ या विषयावरील कीर्तन महोत्सवाला आफळेबुवा यांनी प्रारंभ केला.यावेळी माधव कुलकर्णी, कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी, उमेश आंबर्डेकर, निवेदक महेश सरदेसाई, मकरंद करंदीकर आदींसह कीर्तनसंध्याचे कार्यकर्ते उपस्थित होते.आफळेबुवा यांनी सांगितले की, सुरवातीला शाळेचे पटांगण आणि आज पाचव्या वर्षी भव्य क्रीडा संकुल येथे हा महोत्सव होत आहे, ही आनंदाची बाब आहे. पावसमध्ये स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवात कीर्तन केले. तेव्हापासूनच कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली. कीर्तनातून पाच दिवस पेशवाईचा इतिहास मांडणार आहे. पेशवाईचा समाजामध्ये मराठी साम्राज्य बुडवणारा कालावधी असा गैरसमज आहे. साठ वर्षांच्या शिवशाहीला पुढे शंभर वर्षे पेशवाईने सांभाळले, हे लक्षात घ्यायला हवे. तबलासाथ कणकवलीचे प्रसाद करंबेळकर, आॅर्गनसाथ चिपळूणचे हर्षल काटदरे आणि पखवाजसाथ केदार लिंंगायत यांनी केली.सुरुवातीला ब्रह्मवृंदांनी मंत्रपठण केले. वादकांसह, अद्ययावत साऊंड सिस्टीम देणारे उदयराज सावंत, मंडप व्यवस्थापक अमरेश सावंत, पराग हेळेकर, मकरंद पटवर्धन यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
रत्नागिरीतील मोठ्या कीर्तन महोत्सवास प्रारंभ
By admin | Published: January 07, 2016 12:11 AM