सावंतवाडी : जगात अडीच लाख कोटींची ज्वेलरी निर्यात केली जाते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णकार व कारागिरांसाठी जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. भविष्यात सुवर्ण कारागिरांना परदेशात मागणी वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केले .जेम्स व ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या कौशल्य विकास कार्यक्रमास जेम्स अॅण्ड ज्वेलरीचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रमोद अग्रवाल, व्यवस्थापक (मुंबई) किरीट भन्साळी, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, सुवर्णकार संघाचे श्रीपाद चोडणकर, संजू शिरोडकर, सुनील खेडेकर आदी उपस्थित होते.जेम्स अॅण्ड ज्वेलरीचे किरीट भन्साळी म्हणाले, कारागिरी करणारा ग्रामीण भागातील माणूस जागतिक व्यापाराशी जोडला जावा, म्हणून जेम्स अॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरीतही अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुंबईत लवकरच ज्वेलरी पार्क सुरू करण्यात येणार आहे. जेम्स अॅण्ड ज्वेलरीचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल मणियार यांनी कारागिरांना या उद्योगाबाबत व प्रमोद अग्रवाल यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्पांची माहिती दिली.
सुवर्ण कारागिरांना भविष्यात मोठ्या संधी- सुरेश प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 4:20 AM