सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक होत असून, या निवडणुकीत भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न पक्षासमोर पडला आहे. मात्र, सध्यातरी संजू परब यांचे नाव आघाडीवर असले तरी ऐन निवडणुकीत पक्षाला बंडखोरीची लागण होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १२ डिसेंबरला पक्षाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. त्यामुळे मोठी बंडखोरी होणार नाही, असे पक्षाला वाटत आहे.
सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा बबन साळगावकर यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना व भाजप या सर्व पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. मात्र, इतर पक्षातील इच्छुक पक्षाने एकाला उमेदवारी जाहीर केल्यानंतर थांबण्यास तयार आहेत. इतर पक्षात फारशी बंडखोरी होणार नाही. मात्र, भाजपमध्ये तसे नाही.
तीन वर्षांपूर्वी प्रभाग क्रमांक पाचमधून नगरसेवकपदी अपक्ष निवडून आलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर या उपनगराध्यक्षा आहेत. परब व कोरगांवकर यांच्या व्यतिरिक्त नगरसेवक आनंद नेवगी, निशांत तोरस्कर, अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांचा समावेश आहे. हे सर्व जण इच्छुक असून, तेही पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे. पण पक्षाने उमेदवारी दिली नाहीतरी पक्षासाठी काम करणार असेही त्यातील अनेकांनी जाहीर केले आहे.
जिल्ह्यात सावंतवाडी नगरपालिकेला एक वेगळे महत्व आहे. त्यामुळे अनेकांनी या नगरीचा नगराध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, प्रत्येक पक्षातून एकालाच उमेदवार मिळू शकते हे तेवढेच खरे आहे. असे असले तरी भाजपमध्ये इच्छुकांची असलेली मोठी संख्या पाहता पक्षाने सुरुवातीला ६ डिसेंबरला उमेदवाराचे नाव घोषित करणार आहे असे जाहीर केले होते. पण नंतर आता तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे.
मात्र, आता भाजपने सर्व चाचपणी करून १२ डिसेंबरला उमेदवार जाहीर करण्याचे निश्चित केले आहे. म्हणजे अखेरच्या दिवशी फारशी बंडखोरी होणार नाही. असेच भाजपच्या वरिष्ठांना वाटत असून, त्या अगोदर नाव जाहीर केले तर त्याचा पूर्ण परिणाम हा निवडणुकीवर होऊ शकतो, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.
संजू परब प्रबळ दावेदार
साळगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर कोरगांवकर या प्रभारी नगराध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. तसेच पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात रहाणार असे जाहीरही केले आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत एकप्रकारे पक्षाला विचार करण्यास भाग पाडले आहे. मात्र दुसरीकडे नुकतेच पक्षात दाखल झालेले संजू परब यांनाही वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीचा शब्द दिला आहे. त्यामुळे तेही प्रमुख दावेदार बनले असून, त्यांनी प्रभागनिहाय काम करण्यास सुरुवात केली आहे. सध्यातरी पक्षाकडे त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
भाजप नेत्यांकडून चाचपणी
भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी सकाळी पक्ष कार्यालयात सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. यावेळी शहरात निवडणूक यंत्रणा कशी राबवायची याची माहित दिली. तसेच उमेदवाराचे नाव १२ डिसेंबरला जाहीर करणार असेही चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले आहे. यावेळी राजन तेली, महेश सारंग, संजू परब, अन्नपूर्णा कोरगावकर, मनोज नाईक, दादू कविटकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.