दत्ता पाटील - तासगाव -एकमेव नगरसेवक असलेल्या काँग्रेसने राष्ट्रवादी नगरसेवकांच्या पाठिंब्यावर हातात घड्याळ घालून नगराध्यक्ष पदाच्या सिंहासनावर दावा केला. तालुक्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे राष्ट्रवादी-काँग्रेसचे सिंंहासन डळमळणार नाही, असे वाटत होते. याचवेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपने हाताशी धरुन धक्कातंत्र अवलंबले. काँग्रेसच्या हातावर चढविलेल्या घड्याळाच्या काट्यांनी तासगावात भाजपचे कमळ फुलविण्याचा मार्ग सुकर झाला. तासगावातील राजकीय भूकंपासाठी नगराध्यक्ष पदाची खुर्ची केंद्रबिंदू ठरली. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादीचा काट्याने काटा काढण्याची यशस्वी खेळी भाजपने केली. खरे तर तासगाव नगरपालिकेतील दोन अपक्ष आणि एका काँग्रेस नगरसेवकाचा अपवाद सोडला, तर उर्वरित सर्व नगरसेवकांनी हातात घड्याळ बांधूनच नगरपालिकेत प्रवेश केला होता. मात्र गेल्या काही वर्षात राजकीय परिस्थितीत बदल झाला. खासदार संजयकाकांनी भाजपची वाट धरली.त्यांच्याबरोबर त्यांच्या शिलेदार नगरसेवकांनीही भाजपचा रस्ता धरला. नगरपालिकेतील राजकारण अस्थिर झाले. काका गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसच्या एकमेव नगरसेवकाला नगराध्यक्ष पदाची खुर्ची बहाल केली. तेव्हापासूनच खरे तर राष्ट्रवादीत असंतोषाचा लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली. वर्षभराच्या कालावधीनंतर काका गटाच्या नगरसेवकांनी या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी पुढाकार घेतला. काँग्रेसच्या नगराध्यक्षाने राजीनामा देण्यासाठी आबा गटाला पाठिंबा देण्यासाठी सहमती दर्शवली. मात्र राष्ट्रवादीकडून राजकीय भवितव्याचा विचार करुन, काका गटाशी जुळवून घेण्यासाठी नेत्यांनी विरोध केला. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा भाजपच्या नेत्यांनी घेतला. राष्ट्रवादीतील नाराजीला खत-पाणी घातले. इतके दिवस नगराध्यक्षांच्या खुर्चीखाली उसळत असलेला लाव्हारस बाहेर आला. राष्ट्रवादीत राजकीय भूकंप झाला. तीन नगरसेवकांनी भाजपचे कमळ हातात घेतले. मात्र नगराध्यक्षाच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी आणखी दोन नगरसेवकांची आवश्यकता होती. त्यामुळे पुन्हा तीन नगरसेवकांना गळ लावला. पण त्यांना भाजपमध्ये खेचण्यात अपयश आले. मात्र नगराध्यक्षांविरोधात आणि पर्यायाने राष्ट्रवादीविरोधात उभे करण्यात यश आले. सहा नगरसेवकांचे काटे राष्ट्रवादीच्या निर्णयाच्या उलट दिशेने फिरले. त्यामुळे राष्ट्रवादीत दोनच नगरसेवक राहणार असून नगरपालिकेच्या राजकारणात पक्षाचे बारा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेत भाजपचे कमळ फुलविण्याचा मार्ग मोकळा झाला असून, काट्याने काटा काढण्याची खेळी यशस्वी ठरली आहे. या सर्व घडामोडी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठीच झालेल्या असून, येणाऱ्या काळात ही खुर्ची आणखी कोणता रंग आणणार, याकडे तासगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहेनाराजीच्या धक्क्यांची परंपरा जुनीच तीन नगरसेवकांनी नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापैकी दोन नगरसेवकांना नगराध्यक्षपदाचे आश्वासन देण्यात आले आहे. याच नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे नगराध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र नेत्यांनी दिलेला सबुरीचा सल्ला त्यांना पचनी पडला नाही. नगरपालिकेत दोन्ही गटांनी एकत्रित निवडून आल्यापासूनच आबा गटाला नाराजीचा सामना करावा लागला होता. याच नाराजीतून वर्षापूर्वी माजी नगराध्यक्ष दिनकर धाबुगडे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका जयश्री धाबुगडे यांनी काका गटात प्रवेश केला होता.
भाजपने काढला राष्ट्रवादीचा ‘काट्याने काटा’
By admin | Published: September 13, 2015 9:49 PM