सावंतवाडी : महाराष्ट्रात भाजपचा जनाधार घटला आहे, त्यामुळेच त्यांना इतर पक्षाच्या नेत्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचा एकही नेता भाजपकडे जाणार नाही. आता काँग्रेसकडेच सर्वसामान्य जनता आशेचा किरण म्हणून पाहत आहेत असा विश्वास माजी मंत्री, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री असले तरी त्याचा मित्रपक्ष भाजपच त्याच्यावर नाराज आहेत. पर्यटनासाठी ते कोल्हापुरात येतात, असे त्यांचे म्हणणे मग त्याच्यावर न बोललेच बरे असे म्हणत पाटील यांनी मंत्री केसरकर यांना चिमटा काढला.आमदार सतेज पाटील हे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकण दौर्यावर आहेत. यावेळी त्यांनी राणी पार्वती देवी हायस्कुलमध्ये काँग्रेस पदाधिकार्यांशी चर्चा करत कामाचा आढावा घेतला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख, विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, रविंद्र म्हापसेकर, राजू मसुरकर, महेंद्र सागेलकर, समीर वंजारी, विभावरी सूकी आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून त्याची मते जाणून घेण्यात येतील आणि तसा अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात येणार आहे. त्यावर ते निर्णय घेतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस संघटना अजूनही बळकट आहे. फक्त त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.काँग्रेसचा एकही नेता, आमदार भाजपकडे जाणार नाही महाराष्ट्रात सध्या राजकारणात कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न जनतेला पडला आहे. पण जनतेला काँग्रेस वर पूर्णपणे विश्वास असून त्याचा विश्वास काँग्रेस सार्थकी लावेल. एकही नेता किंवा आमदार भाजपकडे जाणार नसून याची आम्हाला खात्री आहे. मुळातच राज्यातील भाजपकडे जनाधार राहिला नसल्याने 105 आमदार असलेल्या भाजपला 14 मंत्री घेऊन समाधान मानावे लागत असून दुसरे पक्ष फोडावे लागत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट.शरद पवार इंडिया आघाडी सोबतच अजित पवार यांच्या बरोबर काही आमदार जरी भाजप सोबत गेले असले तरी शरद पवार यांनी इंडिया आघाडी सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणाच्या मनात संभ्रम नसल्याचे पाटील यांनी सांगितले.काँग्रेसच्या कोणाला ईडीची नोटीस नाहीकाँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला ईडीची नोटीस आली नाही. भाजप सोबत गेलेल्यांना ईडी सीबीआयची नोटीस आली होती का याची माहिती पत्रकारांनीच घ्यावी असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात भाजपचा जनाधार घटल्याने फोडाफोडी, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका
By अनंत खं.जाधव | Published: August 09, 2023 4:50 PM