मालवण : अव्वाच्या सव्वा पद्धतीने काढण्यात आलेली वीज बिले रद्द झालीच पाहिजेत. नव्याने सर्व्हे करून २०१९ च्या वीज दरानुसार वीजबिल आकारणी व्हावी. नवीन दरवाढही रद्द व्हावी. याबाबत येत्या १५ दिवसांत वीज वितरण व राज्य शासनाने कार्यवाही करावी. अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल, असा संतप्त इशारा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी मालवण शहर वीज वितरण अधिकाऱ्यांना दिला आहे.दरम्यान, लॉकडाऊन कालावधीत उद्योग, व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे काढण्यात आलेली वाढीव वीजबिले जनतेचे कंबरडे मोडणारी आहेत. तरी आलेली वीज बिले तत्काळ रद्द करून पूर्वीच्या दरानुसार वापर झालेल्या वीज युनिटप्रमाणे वीज बिलांची आकारणी व्हावी, अशी मागणी भाजप शहर तालुकाध्यक्ष दीपक पाटकर यांनी केली आहे.वाढीव वीजबिल, सतत खंडित होणारा वीजपुरवठा व अन्य वीज समस्यांबाबत मालवण शहर भाजपच्यावतीने माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, तालुकाध्यक्ष दीपक पाटकर यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालयावर धडक देण्यात आली.
यावेळी पालिका गटनेते गणेश कुशे, आरोग्य सभापती पूजा सरकारे, नगरसेवक आप्पा लुडबे, जगदीश गावकर, पूजा करलकर, ममता वराडकर, भाऊ सामंत, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, नाना पारकर, नाना साईल यांसह व्यापारी बांधव व नागरिक उपस्थित होते. भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनीही शहर भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.नागरिकांसह वीज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिलासादायक तोडगा काढला जाईल, अशी भूमिका वीज अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. १७ आॅगस्टला सकाळी ११ ते २ वेळेत बैठक होणार आहे. सरासरी वीजबिल जादा आले तर ते निश्चित कमी होईल. तसेच टप्प्याटप्प्याने वीजबिल भरणा करताना ग्राहकांना व्याज रकमेचा फटका बसू नये, ही ग्राहकांची मागणीही वरिष्ठांकडे पाठवली जाईल, असेही वीज अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.