कणकवली : विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने रविवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कणकवली मतदारसंघातून विद्यमान आमदार नितेश नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. या मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे कुणाला उमेदवारी मिळणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.नितेश राणे यांनी २०१४ मध्ये प्रथमच कणकवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविली. नितेश राणे ७४ हजार ७१५ मते मिळवून विजयी झाले होते. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे प्रमोद जठार यांना ४८ हजार ८३६ मते मिळाली होती.
त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून ते भाजपकडून लढले. यावेळी नितेश राणे यांना ८४,५०४ मते मिळून ते विजयी झाले होते. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे सतीश सावंत यांना ५६,३८८ मते मिळाली होती. सलग दोन निवडणुका जिंकून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नितेश राणे या निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारून हॅट्ट्रिक साधणार का? याची जिल्हावासीयांमध्ये उत्सुकता आहे.विजयाची हॅट्ट्रिक साधणार का?कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे महायुतीकडून निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला जाणार आहे. महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, सुशांत नाईक हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, अजूनही उमेदवार निश्चित झालेला नाही. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचा समावेश असलेली महायुती व उद्धवसेनेचा समावेश असलेली महाविकास आघाडी यांच्यात कांटे की टक्कर होणार आहे. नितेश राणे सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्ट्रिक साधणार का, हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.