सिंधुदुर्ग: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीमंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खुर्ची लावण्यात आली होती तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री पवार बसले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात ठाकरे आणि राणे यांनी टोलेबाजी लगावली.
गोवा हायवेच्या कामात कंत्राटदारांना कोण अडवतं?, असा सवाल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंनी केला. राणे म्हणाले की, आमचं भागवा आणि काम सुरु करा अशी भूमिका कुणी घेतली ते आज मंचावर उपस्थित आहेत, असंही राणे म्हणाले. राणे म्हणाले की, विमानतळ झालंय मात्र बाहेरचे रस्ते खराब आहेत. इथले लोकप्रतिनिधी काय करतात याची चौकशी करण्यासाठी कुणीतरी नेमा, असंही ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले. तर खासदार विनायक राऊतांनी पेढ्याचा गुणधर्म आत्मसात करावा असंही राणे म्हणाले.
सदर कार्यक्रम पार पडल्यानंतर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचं आज उद्घाटन झालं. मुख्यमंत्री आले आणि गेले, डायलॉग मारायचा प्रयत्न केला पण ज्यांना भाषण जमत नाही ते डायलॉग काय मारणार. मुख्यमंत्री विकासात्मक बोलतील अशी अपेक्षा होती पण नेहमीप्रमाणे फालतू भाषण. राणेंनी व्यासपीठावरून राणेंची ताकद दाखवून दिली, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
आजचा क्षण हा आदळापट करण्याचा नाही- उद्धव ठाकरे
आजचा क्षण हा आदळापट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कुणी काय केलं आणि कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं असा टोला त्यांनी लगावला. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत. पण कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका केली.