सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यां विरोधात भाजपच्या नेत्यांनी एल्गार पुकारला असून, जो पर्यंत अवैध धंदे बंद होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी घोषणाच सिंधुदुर्ग भाजप नेते संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे भाजप पुढे अडचण निर्माण झाली आहे. विशेषता भाजपला प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने आता त्यांच्या पुढे अवैध धंदे बंद करण्याचे आवाहन उभे ठाकले आहे.
परब म्हणाले, पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे सावंतवाडीत अवैध धंदे करणार्यांची दहशत सुरू आहे. येत्या आठ दिवसात ती दहशत आणि गैरप्रकार पोलिसांनी मोडीत काढावेत अन्यथा दहा हजार सह्याची मोहीम राबवून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करू. शहरात राजरोस नाक्यानाक्यांवर सुरू असलेले गैरप्रकार शांत आणि सुसंस्कृत शहराला भूषणावह नाही. त्यामुळे याबाबत आम्ही भविष्यात आक्रमक भूमिका घेणार असून अवैध धंदे आणि त्यांना पाठीशी घालणार्यांचे प्रकार खपवून घेणार नाही. सावंतवाडी शहर बदनाम होत आहे त्यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, असे सांगत परब यांनी अवैध धंद्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. लवकरच या विरोधात उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोंळके यांनी धडक कारवाई करत सावंतवाडीत सुरू असलेले अवैध धंदे उद्ध्वस्त करावेत यात दारू, जुगार, मटका यांच्यासह अमंली पदार्थ विक्री करणार्यांची संख्या जास्त आहे. यावरच हा प्रकार थांबला नाही. तर शहरात वेश्या व्यवसाय ही वाढत आहेत पण पोलिस कोणतीही कारवाई करत नाही. असेही परब म्हणाले.
अवैध व्यावसायिकांकडून शहरात दहशत सुरू आहे. त्यामुळे हे प्रकार रोखण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. तसेच येत्या आठ दिवसात याबाबत योग्य ती कारवाई झाली नाही, तर दहा हजार सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे.असेही परब यांनी सांगितले.
पोलीस हप्ते घेण्यासाठी येतात - सावंतवाडीत अधिकृत असलेल्या काही परमिट रूममध्ये पोलीस हप्ते घेण्यासाठी येतात याबाबत ही आम्ही लवकरच पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून हे कोण पोलीस आहेत त्याची नावे ही देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले