कणकवली : राज्यातील भाजप सरकारचे मंत्री निर्णयक्षमता असलेले आहेत. समस्यांवर तातडीने निर्णय घेत सरकारने आपल्या कामाची चुणूक दाखवली असून, भाजप सरकार पूर्ण क्षमतेने सक्रिय झाल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले. कणकवली शहरात रविवारी सदस्य नोंदणीचा प्रारंभ बसस्थानकासमोर करण्यात आला. यावेळी जठार बोलत होते. जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर, प्रमोद रावराणे, गणेश साळुंखे उपस्थित होते. जठार म्हणाले की, प्रत्येक बुथवर २०० सदस्य नोंदणीचे आमचे उद्दिष्ट आहे. गेल्यावर्षीपर्यंत २४ हजार ७०० सदस्य नोंदणी झाली होती. सद्य:स्थितीत ३० हजार सदस्य नोंदणी झाली असून, १५ फेबु्रवारीपर्यंत ६० हजारांवर हा आकडा जाईल. सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मार्चअखेरपर्यंत २ लाखांचे उद्दिष्ट गाठण्यात येणार आहे. माजी आमदार असलो तरी जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्नाबाबत मंत्रालयात जोरदार पाठपुरावा करत आहे. मागील सरकारचा ‘लकवा’ गेला असून, भाजप सरकार आता चालू लागले आहे.सरकार घेत असलेल्या निर्णयांवरून हे सरकार आता धावायला लागेल, असे दिसते. अधिकारी निर्धास्तपणे निर्णय घेत आहेत. शुद्ध हेतू ठेवून निर्णय घेतले तर सरकार पाठीशी उभे राहण्याची ग्वाही प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. कोणत्याही प्रश्नाबाबत आठ दिवसांत निर्णय घेण्याचा धडाका सरकारमधील मंत्र्यांनी लावला आहे. मालवण येथील पर्यटन महोत्सवाअगोदर मुख्यमंत्र्यांसोबत सी-वर्ल्डसंदर्भात बैठक झाली आणि पर्यटन महोत्सवात अतिरिक्त जमीन परत करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. आंग्रीया बेट विकासासंदर्भात केंद्राकडे फाईल पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवगड नळयोजना, तिलारी प्रकल्पग्रस्तांची वनटाईम सेटलमेंटसंदर्भात मंगळवारी मंत्रालय स्तरावर बैठक होणार आहे. विजयदुर्ग बंदर विकासासंदर्भात जेएनपीटी २ असा प्रकल्प साकार करण्यात येणार असल्याचे जेएनपीटीच्या विश्वस्तांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)आठ दिवसांत सुधारणारॉकेल कोटा वाढवणे, एपीएलचे धान्य मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. येत्या आठ दिवसांत याबाबत सुधारणा दिसून येईल, अशी माहिती जठार यांनी दिली.
कणकवलीत भाजपची सदस्य नोंदणी
By admin | Published: February 09, 2015 9:21 PM