..तर संजय राऊतांना का मिर्ची झोंबते? नितेश राणेंचा सवाल
By सुधीर राणे | Published: September 27, 2023 01:52 PM2023-09-27T13:52:13+5:302023-09-27T13:54:20+5:30
मात्र, त्यावेळी आदित्य ठाकरे परदेश दौरा करत होते
कणकवली: काँग्रेसवर टीका केली की संजय राऊत यांना मिर्ची झोंबते. त्याचे नेमके काय कारण आहे? आदित्य ठाकरे यांच्या ट्विटमुळे साधी माशीसुद्धा मरत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी स्थिती बघून आपला विदेश दौरा रद्द केला. मात्र, जेव्हा उद्धव ठाकरे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होते त्यावेळी आदित्य ठाकरे परदेश दौरा करत होते. याबाबत संजय राऊत यांनी आधी बोलावे असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला.
कणकवली येथे बुधवारी आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, वडील गंभीर आजारी असताना आपण स्वतः मुख्यमंत्री कसे होऊ शकतो याचा प्रस्ताव आपल्या आईच्या माध्यमातून 'मविआ' कडे आदित्य ठाकरे देत होते. बाळासाहेब ठाकरेंची १७ नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी असतानाही आदित्य ठाकरे परदेश दौऱ्यात व्यस्त होते. ते समाधी स्थळी आले नाहीत. याला नेमके काय म्हणावे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
येत्या हिवाळी अधिवेशनाआधी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राज्यातील महायुती शासनात मंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपात फूट पडण्याची स्वप्ने पाहू नयेत. महिला आरक्षणाचा त्रास सर्वात जास्त संजय राऊत यांना होणार आहे. कारण त्यांची वर्तणूक ठीक नाही. असा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला.