सिंधुदुर्ग: संतोष परब हल्ल्यातील आरोपी भाजपाचे आमदार नितेश राणे व गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या ३० डिसेंबर रोजी निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले. नितेश राणे, गोट्या सावंत यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे.
२८ डिसेंबर रोजी सायंकाळी उशीरापर्यंत नितेश राणे, गोट्या सावंत यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर आज दुपारनंतर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील घरत यांनी केलेल्या युक्तिवादात नितेश राणे, गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी जोरदार प्रयत्न केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी याबाबत उद्या ३० डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. आजही न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही वकिलांनी बाजू ऐकून घेतल्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारी वकील जाणूनबुजून वेळ काढत आहेत, असं म्हणत नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी म्हटलं. तसेच पोलीस तपास पूर्णत: एकतर्फी पद्धतीने सुरू आहे. राज्याचे पोलीस महासंचालक या जिल्हयात येऊन बसले आहेत, असं संग्राम देसाई यांनी म्हटलं आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक उपस्थित आहेतर तर देशाचे केंद्रीय मंत्री या जिल्ह्यात काय करत आहे, असा सवाल सरकारी वकील घरत यांनी उपस्थित केला. या प्रकरणात सात मोबाईल पोलिसांना जप्त करण्याची परवानगी द्यावी, त्याच सोबत नितेश राणे तपासात अजिबात सहकार्य करत नाहीत. वरील सर्व गोष्टींचा विचार करता आरोपींचा जामीन फेटाळावा, अशी मागणीही सरकारी वकिलांनी केली आहे.
दरम्यान, नितेश राणे हे नेमके कुठे आहे, याचंही गूढ कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस पाठवली होती. ही नोटीस नारायण राणेंच्या घरावर चिकटवण्यात आली होती. ही नोटीस दहा मिनिटांतच काढूनही टाकण्यात आली. मात्र मी व्यस्त असल्यानं चौकशीला येऊ शकत नाही. दोन ते तीन दिवस मी व्यस्त असणार आहे. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माझा जबाब नोंदवू शकता, असं उत्तर नारायण राणे यांनी पोलिसांच्या नोटिशीला दिलं आहे.