मुंबई/ सिंधुदुर्ग: राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
सिंधुदुर्गमधील कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींवर शिवसेनाप्रणित, तर एका ग्रामपंचायतवर भाजपानेप्रणित विजय मिळवला आहे. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेने, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीवर भाजपाने बाजी मारली आहे.
भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा कणकवली मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. दोघांमधून विस्तवही जात नाही. नारायण राणे यांच्यासह त्यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश आणि नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत असतात. अनेकदा राणे यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा यांचा एकेरी उल्लेख करुन टीका केली आहे. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत राणेंना प्रत्युत्तर देखील दिलं होतं. अशा परिस्थितीत शिवसेनेने नितेश राणेंच्याच मतदारसंघात बाजी मारत वचपा काढल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेचा सुरुंग-
गारगोटीजवळ असलेल्या खानापूर गावामध्ये शिवसेनेने 9 पैकी सहा जागा जिंकून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना धक्का दिला आहे. महत्वाचे म्हणजे खानापूरमध्ये भाजपाचीच सत्ता होती. यंदा निवडणुकीत शिवसेनेला थोपविण्यासाठी भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती देखील केली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली होती. अशातही शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळविला आहे.
हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता-
ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशाला दिशादर्शक असणारं 'आदर्श गाव हिवरेबाजार' येथे 30 वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. या हिवरेबाजार ग्रामपंचायत निकालाचा सध्या हाती आलेल्या आकडेवारीनूसार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला आहे. हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने सातही जागांवर विजय मिळवलेला आहे. आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये तब्बल 30 वर्षांनंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले.
12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणीला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.