सावंतवाडी : उद्धव ठाकरेंनी धुडकावल्याने दीपक केसरकर आता रिकामी झालेत. त्यामुळेच ते मतदार संघात फिरताना दिसत आहेत असा चिमटा नगराध्यक्ष संजू परब यांनी काढला. केसरकर यांनी रस्त्याच्या कामावरुन भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला संजू परब यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांचे नको, मीच दीपक केसरकरांना पुरून उरेन, आमची पुढची लढाई ही शिवसेनेशी नाही तर राष्ट्रवादीशी असेल त्यामुळे या पुढे ही त्याची पुनरावृत्ती दिसेल असा इशाराही नगराध्यक्ष परब यांनी पत्रकार परिषदेत बोलत दिला.
दरम्यान सावंतवाडीच्या जनतेने पैसे घेवून मते घातली असा आरोप करून सावंतवाडीकरांना बदनाम करण्याचे काम त्यांनी केले असून उद्धव ठाकरेंनी धुडकावल्याने ते आता रिकामी झालेत असा चिमटा त्यांनी काढला. तर पुढे बोलताना परब म्हणाले, केसरकर यांना आता आघाडी शिवाय पर्याय राहिला नाही. त्यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी एकही चेहरा राहिला नाही. त्यामुळे आमची पुढची लढाई शिवसेनेशी नाही तर राष्ट्रवादीशी असणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान ज्यावेळी केसरकरांविरोधात मी ठाम राहिलो, त्यावेळी येथील जनतेने माझ्याच बाजूने कौल दिला आहे. त्यांना मी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा त्यांना निश्चित पराभवाची पुन्हा धूळ चारू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या पत्रकार परिषदेस आनंद नेवगी, दिलीप भालेकर, अजय गोंदावळे, मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते.