सिंधुदुर्ग: शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची तिसऱ्यांदा कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. मात्र, त्यापूर्वी नितेश राणे यांनी कणकवली पोलीस स्थानकात हजेरी लावली आणि चौकशीला सामोरे गेले. नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होत आहे. नितेश राणे यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी बाजू मांडणार आहेत. सर्वोच्च न्यायालय नितेश राणे यांना दिलासा देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास नितेश राणेंवर अटकेची कारवाई अटळ असल्याचे सांगितले जात आहे.
नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात हजर
नितेश राणे बुधवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले होते. सलग तिसऱ्या दिवशी नितेश राणेंनी कणकवली पोलीस स्थानकात हजेरी लावली. यावेळी १५ मिनिटे नितेश राणेंची चौकशी करण्यात आली. यानंतर बोलताना नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलिसांनी मला नोटीस दिली होती. त्याप्रमाणे हजर झालो. यानंतरही हजर होणार आहे. पोलीस तपासात सहकार्य करेन, असा पहिल्या दिवसापासून शब्द दिला होता. त्यानुसार पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या वेळात मी उपस्थित झालो आहे. यापुढेही जिथे सहकार्य लागेल तिथे सहकार्य करण्यासाठी तयार आहे, असे नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयातही नितेश राणेंना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे अटक टाळण्यासाठी आता नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.