कणकवली : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मधुसुदन बांदिवडेकर यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपच्यावतीने शोकसभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. ही सभा व्हर्चुअल माध्यमातून घेण्यात आली.या सभेला माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण,जिल्हाध्यक्ष राजन तेली,अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत यांच्यासह जिल्हा आणि तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.गेली २५ ते ३० वर्षे सक्रीय राजकारणात असलेले, लोकप्रतिनिधी आणि पक्षासाठी कुशल संघटक म्हणून काम केलेल्या मधुसुदन बांदिवडेकर यांच्या अकाली जाण्याने भारतीय जनता पार्टीची अपरिमित हानी झालेली आहे. अशा भावना अनेकांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.दिल्लीवरून मधुसुदन बांदिवडेकर यांच्याविषयी बोलताना नारायण राणे हे अत्यंत भावूक झाले.मधुसुदन सारख्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर यावी हे माझे दुर्दैव आहे.अत्यंत मेहनती, उत्साही आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्ष आणि राणे कुटुंबीय मुकले आहेत. कुटुंबातील व्यक्ती गेल्याचे दुःख या घटनेने आपल्याला झाले असल्याचे ते म्हणाले.सुरेश प्रभू म्हणाले , १९९६ च्या लोकसभा निवडणुकीपासून मधुसुदनशी माझे घनिष्ठ संबंध होते. अनेक सभा , बैठका आणि प्रवासात आम्ही एकत्र होतो.त्यांच्या मागणीनुसार फोंडा येथे परिवर्तन केंद्र सुरू केले होते.अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या आकस्मित निधनाने मनाला वेदना झाल्या.सर्वच कार्यकर्त्यांनी या काळात आपापली काळजी घ्यावी असे आवाहन प्रभू यांनी केले.रविंद्र चव्हाण म्हणाले , मधुसुदन आणि मी अगदी विरोधी पक्षात असतानासुद्धा त्याच्या कामाबद्दल, निष्ठेबद्दल मनात आदर होता.अलीकडच्या सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीत त्याचे संघटन कौशल्य अगदी जवळून पाहायला मिळाले. असे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते निर्माण व्हायला खूप काळ लागतो.त्यांच्या जाण्याने मनाला खूप वेदना होतात.आमदार नितेश राणे म्हणाले,त्यांच्यावर माझे आणि त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. आम्ही लहान असताना नारायण राणे यांच्याशी असलेले त्यांचे प्रेमाचे नाते त्यांनी तसेच आमच्यासाठी पुढे सुरू ठेवले होते.माझ्या दोन निवडणुका, इतर सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असायची. सभा असो वा आंदोलन असो,तयारीचा, नियोजनाचा भाग ते सांभाळत होते.खूप मेहनती,निष्ठवंत आणि मार्गदर्शकाला मी मुकलो आहे.त्यांच्यासाठी शेवटी खूप प्रयत्न केले,पण मी हरलो.माजी खासदार निलेश राणे यांनी कुटुंबातील व्यक्ती गेल्याचे सांगत,खासदारकीची निवडणूक त्यातले त्यांचे श्रम,कौटुंबिक संबंध याना उजाळा दिला. राजन तेली म्हणाले ,सुरुवातीपासून आम्ही एकत्र काम करत होतो. त्यांच्या कामाची एक विशिष्ट पद्धत होती.
अलीकडच्या काळात आम्ही सगळे कार्यक्रम, बैठका करताना एकत्र होतो.माझ्या टीममधील हिरा काळाच्या पडद्याआड गेला.भारतीय जनता पार्टी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. या शोकसभेत वासुदेव परब, अच्युत गावडे आणि पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्या निधन पावलेल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना श्रद्धांजली वहाण्यात आली.