कणकवली : वीज बिल माफ करण्यासाठी शुक्रवारी कणकवली भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीज वितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक देण्यात आली. वाढीव वीज बिलामुळे सामान्य जनतेचा सुरू असलेला छळ थांबवा अशी मागणी करत भाजपा पदाधिकाऱ्यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.यावेळी ठाकरे सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.वाढीव वीजबिल माफ न केल्यास आणखीन तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे , राजन चिके यांनी दिला.दरम्यान , आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडविले . त्यामुळे पोलीस व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. तसेच आम्ही कार्यालयात निवेदन द्यायला जाणार नाही. अधिकाऱ्यांनाच बाहेर बोलवा. असे सांगत भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय परिसराच्या प्रवेशद्वारावर काही वेळ ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली.त्यानंतर कार्यकारी आभियंता बाळासाहेब मोहिते यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत यांच्या सोबत प्रवेशद्वारावर येऊन भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच निवेदन स्वीकारले . यावेळी तालुकाध्यक्ष संतोष कानडे , राजन चिके यांच्यासह जिल्हा पदाधिकारी राजश्री धुमाळे , युवा मोर्चा जिल्ह्य संघटन सचिव संदीप मेस्त्री, तालुका उपाध्यक्ष बबलू सावंत , महेश गुरव , शहराध्यक्ष अण्णा कोदे , महिला तालुकाध्यक्षा हर्षदा वाळके , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन पाडावे , गणेश तळवकर , पपू पूजारे , विजय इंगळे , विजय चिंदरकर , सदा चव्हाण , प्राची कर्पे, पंढरी वायंगणकर, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे , राजू पेडणेकर यांच्यासह कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी ' या सरकारचे करायचे काय ? खाली डोके वर पाय ' , ' भरमसाठ विजबिले देणारे ठाकरे सरकार हाय हाय' ,' ठाकरे सरकारचा निषेध असो' अशा घोषणा देणात आल्या.याचवेळी मोठा पोलीस बंदोबस्त का ठेवला ? आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत. ही ठाकरे सरकारची दडपशाही चालली असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला.दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात , विनायक चव्हाण,मंगेश बावदाने यांनी आंदोलकांना समजावत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला बंदोबस्त असल्याचे सांगितले . त्यामुळे तंग झालेले वातावरण काहीसे निवळले.कणकवली तालुका वीज ग्राहक मेळावा १० डिसेंबर रोजी !कणकवली तालुक्यातील वीज ग्राहक मेळावा घेण्याचे यापूर्वी ठरले होते. मात्र तो घेतलेला नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत.हा मेळावा लवकरात लवकर घ्या आम्ही सहकार्य करतो . मात्र , वीज बिल भरण्यासाठी सक्ती केलात तर परिणाम चांगले होणार नाहीत .असे भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता मोहिते यांना सुनावले. त्यानंतर १० डिसेंबर रोजी कणकवली तालुक्याचा वीज ग्राहक मेळावा घेण्याचे यावेळी मोहिते यांनी जाहीर केले .