मालवण : मालवण शहरातील प्रसिद्ध अशा भरड नाक्यावर गुरुवारी सकाळी आंगणेवाडी यात्रा उत्सवासाठी शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवरून ठाकरे शिवसेना आणि भाजप युवा मोठा वाद रंगला. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी यात हस्तक्षेप करीत वादावर पडदा टाकला. तरीही युवा कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरूच होती. बॅनर वादामुळे भरड नाक्यावर काही काळ वातावरण तंग बनले होते.दोन पक्षांतील पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांच्या वादामुळे भरड नाक्यावर मात्र बघ्यांची एकच गर्दी झाली होती. ठाकरे गट शिवसेनेकडून दोन महिने अगोदरच भरड नाक्यावर स्वागत कमान उभारण्याची परवानगी नगरपालिकेकडून घेतली होती. त्यानुसार त्यांनी कमान उगारली. मात्र भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी एक बॅनर त्याच ठिकाणी लावला.तो बॅनर कमान उभारण्याच्या अगोदर लावण्यात आला होता. मात्र कमानीच्या पाठीमागे बॅनर जात असल्याने शिवसेनेकडून भाजपच्या काही युवा कार्यकर्त्यांना कल्पना देऊन तो बॅनर काढला. मात्र याची माहिती इतर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना न झाल्याने त्यांनी बॅनर नसल्याचे पाहून वाद निर्माण केला.भाजपकडून अशोक सावंत, अशोक तोडणकर, दाजी सावजी, ललित चव्हाण, निश्चय पालयेकर, राकेश सावंत तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते; तर शिवसेनेकडून हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार ओरसकर, किरण वाळके, उमेश मांजरेकर, ननो गिरकर, अमित वाळके तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपाची सामोपचाराची भूमिकाभरड नाक्यावर भाजप युवा कार्यकर्ते आक्रमक होऊन बोलत होते. यावेळी त्यांना शिवसेना युवासेना पदाधिकारी यांनीही तोडीस तोड उत्तर दिले. युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर यांनी एकहाती किल्ला लढवत भाजपच्या युवा नेत्यांना चांगलेच सुनावले. शिवसेनेचे उमेश मांजरेकर यांनीही वाद टाळण्यासाठी भाजप पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर त्याठिकाणी भाजपचे अशोक सावंत, अशोक तोडणकर हे पदाधिकारी दाखल झाले. वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता भाजपचे पदाधिकारी यांनी सामोपचाराची भाषा घेत आपला काढलेला बॅनर दुसरीकडे लावण्याच्या सूचना करीत वादावर पडदा टाकला.
Sindhudurg News: मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, वातावरण तंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 4:00 PM