सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपात घेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हांला मान्य असेल, अशी स्पष्टोक्ती माजी आमदार राजन तेली यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या ठिकाणी युती होणार की नाही हा आमचा प्रश्न नाही. मात्र, सावंतवाडी विधानसभेची जागा भाजप लढविणार असून कार्यकर्ते पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.येथील पर्णकुटी विश्रामगृहावर राजन तेली व तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी तेली बोलत होते. ते पुढे म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपा पक्षाचे काम चांगल्याप्रकारे सुरू असून संघटना मजबूत आहे.
आंबोली, चौकुळ, गेळे येथील अनेक ग्रामस्थांनी ज्याप्रमाणे भाजपात प्रवेश केला, त्याच धर्तीवर सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते येत्या आठ दिवसांत भाजपात दाखल होणार आहेत. त्यामुळे पक्षाची वाढणारी ताकद व पक्षाने दिलेले आदेश लक्षात घेता भाजपाची संपूर्ण टिम विधानसभेसाठी सज्ज झाली आहे.तर आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे काम जोमाने व्हावे यादृष्टीने सावंतवाडी तालुक्यातील कार्यकारिणीची नव्याने नियुक्ती केल्याची माहिती तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी दिली. यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी चर्चा करण्यात आली, असे ते म्हणाले.पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्यराज्यात युती होणार की नाही हा आमचा प्रश्न नाही. मात्र, पक्षाच्या आदेशाप्रमाणे सावंतवाडीची जागा भाजप लढविणार असून तशाप्रकारचे कामही सुरू करण्यात आले. येत्या ३० तारीखला या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून प्रदेश पातळीवरून पदाधिकारी जिल्ह्यात येणार आहेत. दरम्यान, नारायण राणे त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबत त्यांना विचारले असता, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हांला मान्य असेल, असे राजन तेली यांनी सांगितले.