वेंगुर्ला : चांगल्या गोष्टी घडण्यामागे नेहमी दैवाचाच हात असतो. मला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोमवारी महायुतीची घोषणा झाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजप कधीही प्रवेश देणार नाही, असे सूतोवाच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथील पत्रकार परिषदेत केले.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, आबा कोंडसकर, सुनील डुबळे, शिवसैनिक सचिन वालावलकर, नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम उपस्थित होते.केसरकर म्हणाले , २ आॅक्टोबर हा महात्मा गांधी यांचा जयंती दिवस. त्यांचा अहिंसा धर्म साऱ्या देशाला माहिती आहे आणि याचदिवशी हिंसा करणारे नारायण राणे यांनी भाजप प्रवेशासाठी मुहूर्त काढला आहे. ज्या पद्धतीची लाचारी राणे करीत आहेत ती त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडणार नाही. केवळ आपल्या मुलाची आमदारकी टिकून रहावी यासाठी ते कार्यकर्त्यांचा बळी देऊ पहात आहेत.जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन चांगला निर्णय घेतला आहे. प्रत्येकाला आपले भवितव्य असते. ज्यांना जनतेसाठी काम करायचे असते ते कोणाच्याही हाताखाली गुलामासारखे काम करू शकत नाहीत. त्यामुळे सावंत यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे एका स्वाभिमानी कार्यकर्त्याने घेतलेला निर्णय आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. ही प्रक्रिया आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली आहे.