सिद्धेश आचरेकर / मालवण केंद्र आणि राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपचा सर्वस्तरावरील निवडणुकासाठी आत्मविश्वास वाढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता काही मोजक्याच ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व आहे. जिल्ह्यातील मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ले नगर परिषदांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपने एका ठिकाणी कमळ फुलवले असले तरी त्यांचा मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भाजपाला आपले जनमानसात पक्ष रुजविण्यासाठी आगामी डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुका भाजपचा कसोटीचा काळ असणार आहे. तर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे हेही आव्हान असणार आहे. मालवण नगर पालिकेच्या १०० वर्षाच्या इतिहासात भाजप या पक्षाने खाते उघडलेले नाही. त्यामुळे यावर्षी भाजपने मालवण पालिकेतील काँग्रेस राजवट संपुष्टात आणायचा पण केला आहे. जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आगामी निवडणुकात शिवसेना आपला शत्रू नसून काँग्रेसच एक नंबरचा शत्रू असेल असे स्पष्ट केले होते. त्यामुळे काँग्रेसी नगरसेवक भाजपच्या रडारवर असून काँग्रेसमुक्त पालिकेचा विडा मालवण शहर भाजपने उचलला आहे. तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषद घेवून काही विद्यमान नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा लवकरच प्रवेशही होईल, असे सूतोवाच करत नवी राजकीय चाल खेळली आहे. भाजपला यावेळी काहीही करून खाते उघडायचेच आहे. बाबा मोंडकर यांच्या गौप्यस्फोटानंतर शहरातील राजकीय वतुर्ळात एकच खळबळ उडाली आहे. विकास आराखड्याच्या मद्यावरून विद्यमान नगरसेवकांना ‘टार्गेट’ करणारे भाजपवाले आता नेमके कोणत्या नगरसेवकांना पक्षात सामावून घेतात याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून आहे. विद्यमान नगरसेवक भाजपात गेल्यास नक्कीच भाजपचे कमळ फुलेल यात सध्यातरी शंका वाटत नाही. दौऱ्यावर राज्यमंत्री चव्हाण असताना त्यांनी काही विद्यमान राष्ट्रवादीच्या व तत्कालीन राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांचे जुने मैत्रीचे संबंध असले तरी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्या भेटीगाठी महत्वाच्या मानल्या जात आहेत. मालवणातही मंत्री चव्हाण यांचे राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी भरड येथे जंगी स्वागत केल्याने राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे राजन वराडकर हे भाजपत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. मोंडकर यांनी विद्यमान नगरसेवक भाजपत प्रवेश करणार असे विधान केल्याने पाच वषार्पूर्वीची राष्ट्रवादी भाजपत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मात्र असले तरी अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते. भाजपच्यादृष्टीने विद्यमान नगरसेवकांनी प्रवेश केला तर मतांच्या टक्केवारीत वाढ होऊन नक्कीच भाजपकडे सत्ता येईल, अशी गणिते मांडली जात आहेत. युतीवर अद्याप निर्णय नाही कुडाळात युती न झाल्याने भाजपला फटका बसला असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालवण पालिकेत शिवसेना-भाजप युती करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी काम सुरु केले असून घराघरात पोहोचण्याचे काम कार्यकर्ते, पदाधिकारी करताना दिसून येत आहेत. भाजपचा सध्या नगरसेवक नसल्याने आगामी निवडणुकीत विजयाच्या दृष्टीने भाजपाकडून निर्णायक मतांची गणिते घातली जात आहे. पालिका निवडणुकाबाबत युती करण्याबाबत कोणतही निर्णय झाला नसल्याचे समजते.
पालिका निवडणुकीत भाजपची कसोटी
By admin | Published: July 17, 2016 11:45 PM