सिंधुदुर्गनगरी : यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा फडकेल. सद्य स्थितीत शिवसेनेच्या गोटात चाललेली धुसफूस व शिवसेनेचे बुडत चाललेले जहाज पाहता या जिल्ह्यात आमच्याशी लढा देणारा कोण शिल्लक राहिलेला नाही, असे आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, गटनेते रणजित देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा नेते दत्ता सामंत उपस्थित होते.
भाजपचे जिल्हा परिषद सदस्य हे निष्ठावंत आहेत. त्यामुळे बुडत चाललेल्या शिवसेनेच्या जहाजात बसून आत्महत्या कोण करणार? आमच्या सदस्यांवर नजर ठेवण्याची आम्हांला गरज पडली नाही. आम्ही सर्व एकसंघ आहोत. नारायण राणे यांचा कार्यकर्ता म्हणून सर्वजण निष्ठेने काम करीत आहोत. हे आजच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून स्पष्ट झाले आहे.
यावेळी नूतन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, खासदार नारायण राणे यांनी माझ्यावर दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. त्या विश्वासाला साजेशे असे काम पुढील वर्षभरात करणार आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात नोंद व्हावी असा आजचा दिवस आहे.
कणकवली तालुक्यात पहिली जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मलाच मान मिळाला आहे. तर पाच वर्षांच्या टर्ममध्ये दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून मलाच संधी मिळाली आहे. त्याबद्दल खासदार नारायण राणे व आमदार नीतेश राणे यांचे आभार मानते, असेही त्या म्हणाल्या.जिल्हा परिषदेमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तजिल्हा परिषद अध्यक्ष निवडीस कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून जिल्हा परिषद आवारात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा परिषदेमध्ये येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर शीघ्र कृतीदलाचे पथक ठेवण्यात आले होते. हे पथक पत्रकार, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणालाच आत सोडत नव्हते. सभागृहाबाहेर देखील १० ते १२ पोलीस कर्मचारी तैनात होते. कार्यकर्ते किंवा इतर कोणालाही सभागृहाच्या जवळपास फिरू देत नव्हते.३१ व्या अध्यक्षपदी संजना सावंत यांची निवड३१ व्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजना सावंत यांची निवड झाली आहे. यापूर्वी चालू पाच वर्षाच्या टर्ममध्ये सावंत यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. अशी कामगिरी करणाऱ्या त्या एकमेव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ठरल्या आहेत. ३ जानेवारी २०१९ ते २६ फेब्रुवारी २०२० या दरम्यान त्या अध्यक्ष होत्या. त्या अगोदर २ एप्रिल २००७ ते १ ऑगस्ट २००८ या कालावधीत त्यांनी महिला व बालकल्याण सभापती पद भूषविले आहे. अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर आता २६ मार्च रोजी विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.लोकमतचे वृत्त खरे ठरलेरविवारच्या अंकात वजाबाकी या सदराखाली लोकमतमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद कणकवलीकडे, संजना सावंत या प्रबळ दावेदार असल्याच्या मथळ्याखाली लिखाण प्रसिद्ध झाले होते. बुधवारी झालेल्या निवडीमध्ये अध्यक्षपद कणकवलीच्या संजना सावंत यांना दिले आहे. त्यामुळे लोकमतचे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.